गुजरातमधील चारण समाजाला असलेली शौर्याची परंपरा नृत्याविष्कारातून समजून घेण्याची संधी मुंबईत उपलब्ध झाली आहे. रविवार, २३ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात सादर होणाऱ्या ‘कथ्थक बियॉण्ड बाऊंडरीज’मध्ये ‘तत्व ग्यान’ या कार्यक्रमात हा नृत्याविष्कार सादर होणार आहे.
कांदिवलीच्या ‘नुपूर झंकार’ या नृत्यसंस्थेच्या संचालक शीला मेहता १२ वर्षांंपासून भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या संस्कृती महोत्सवातून करून देत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी रवींद्र संगीतावर आधारित संस्कृती महोत्सव सादर केला होता. यंदा त्या चारण समाजाची ओळख कथ्थक नृत्याविष्कारातून करून देणार आहेत.
शीला मेहता यांनी कॅनडा, बेल्जियम, इंग्लंड आदी देशांमध्येही अनेक विद्यार्थी घडवले असून याच विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ही शौर्यगाथा साकारणार आहे. मुंबई आणि देशविदेशातील कलावंतांचा एकत्रित अविष्कार म्हणजे ‘कथ्थक बियॉण्ड बाऊंडरीज’! कलेला सीमांचे बंधन नसते. असतो एक अनोखा वैश्विक भावबंध. तोच या कार्यक्रमातून पाहण्याची संधी मिळणार आहे.