नाशिक जिमखान्याचा लॉन टेनिसपटू विक्रांत मेहता औरंगाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेत विजेता ठरला. गारखेडा स्टेडियम येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 विक्रांतने १२ वर्षांआतील गटाचे अजिंक्यपद पटकाविताना महत्वपूर्ण १५ गुणांची कमाई केली. अंतीम सामन्यात त्याची लढत मुंबईच्या इशांत लुम्बाशी झाली. अडीच तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या सामन्यात विक्रांतने सिंगल हॅण्ड, बॅक हॅण्डच्या जोरावर १-६, ६-२, ६-४ अशी मात केली. अंतीम सामना जिंकण्याआधी विक्रांतने अभिषेक शुक्लचा १-६, ६-२, ७-६ तसेच अहान शहावर ९-१, आदित्य श्रीरामवर ८-४, यश चांडकवर ७-४ अशी मात केली. विक्रांत नियमितपणे नाशिक जिमखान्यात राष्ट्रीय लॉन टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
 राष्ट्रीय पहिल्या दहा खेळाडूंमध्ये तो स्थान पटकावेल, असा विश्वास प्रशिक्षकांनी व्यक्त  केला.