शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून पर्यटनाबरोबरच भारतात ठिकठिकाणी सुरू असणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचा उपक्रम अंबरनाथ येथील गुरुकुल शाळा गेले एक तप राबवीत आहे. यंदाच्या वर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशमधील नानाजी देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चित्रकूट परिसरास भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची माहिती घेतली.
१२ तासांची शाळा अशी ओळख असलेल्या गुरुकुलमध्ये मातृपरिचय शिबीर या उपक्रमाअंतर्गत पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपला जिल्हा, ६ व ७ वीच्या विद्यार्थासाठी आपले राज्य आणि ८ व ९ वीच्या विद्यार्थासाठी आपला देश अशा तीन घटकांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो. मध्य प्रदेशमधील चित्रकूट या प्रकल्पास २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान गुरुकुलमधील ६६ विद्यार्थ्यांनी भेट दिली. या उपक्रमांतर्गत सुरू असलेले शेळीपालन, कुक्कुटपालन, वराहपालन हे उद्योग, महिलांसाठीचे शिलाईकाम, भरतकाम, सौंदर्यशास्त्राचा अभ्यास याविषयीची माहिती या विद्यार्थ्यांनी घेतली. तेथील वसतिगृहातील मुलांशी संवाद साधत त्यांच्या लोककला, तेथील नृत्यप्रकार, पारंपरिक भाषा यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. संस्थेच्या नंदिनी पाठक यांनी नानासाहेबांच्या कार्याची ओळख आणि विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यामध्ये येण्यासाठीचे आवाहनही या वेळी त्यांनी केले. तेथील विज्ञान केंद्रामध्ये सुरू असलेल्या काँग्रेस नामक गवत नष्ट करण्याविषयीचा प्रयोगही या विद्यार्थानी पाहिला; तसेच घातक ठरणारे हे गवत नष्ट करण्याचे उपायही विद्यार्थ्यांनी समजून घेतले.
गुरुकुल शाळेची पाचवीचे विद्यार्थी रायगड जिल्ह्य़ातील कोथिंबा गावाजवळच्या वनवासी कल्याण आश्रमामध्ये गेले होते. या शिबिरामध्ये त्यांना श्रमदान, स्वावलंबनाचे धडे देण्यात आले. या भागातही वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वनवासी विद्यार्थासाठी सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. या वेळी या विद्यार्थ्यांनी या भागातील प्रत्येक घरामध्ये आपला एक दिवस व्यतीत करत तेथील लोकांची जीवनशैलीदेखील जवळून अनुभवली. या भेटीत मुलांनी शेणाने जमीन सारवण्याचा आनंद घेतला. हा आयुष्यातील वेगळा अनुभव असल्याचे सहभागी विद्यार्थी सांगत होते.
गो-रक्षण चळवळ..
गुरुकुलचे ६ वी ७ वीचे विद्यार्थी जळगावजवळील सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये गेले होते. त्या भागात ‘अहिंसा तीर्थ’ या गोशाळेला या विद्यार्थ्यांनी भेट दिली. साडेतीन हजारांहून अधिक गुरांच्या या गोशाळेमध्ये या विद्यार्थाना आर. सी. बापना यांनी गोमूत्रावरील विविध संशोधनाची ओळख करून देत गोरक्षणासाठी चाललेल्या चळवळीची ओळख करून दिली.
अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी ‘चित्रकूट’ अनुभवले
शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून पर्यटनाबरोबरच भारतात ठिकठिकाणी सुरू असणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचा उपक्रम
First published on: 03-12-2013 at 07:04 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Native land introduction camp