सामाजिक, राजकीय, कृषी व आíथक क्षेत्र दूषिततेने भरून निघालेले आहे. त्यात विकासाच्या नावाने केवळ कांगावा केला जात आहे. विकास, विकास म्हणजे कोणाचा, असा प्रश्न उपस्थित करून जेष्ठ अर्थतज्ज्ञ व राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य एच. एम. देसरडा यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विकासाची  संकल्पना नव्याने आखण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले.
सेलू येथील स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळय़ात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्या. प्रकाश परांजपे होते. या वेळी मराठवाडा स्तरावर सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल लातूर येथील अॅड. मनोहरराव गोमारे यांना सामाजिक व पत्रकारितेतील योगदानासाठी औरंगाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांना, तर कलाक्षेत्रातील सेवेबद्दल विनोद ऊर्फ बजू पाटील यांना २०१३ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख पाच हजार रुपये सन्माननिधी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे २६ वे वर्ष आहे. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राधाबाई चारठाणकर, सचिव अॅड. श्रीकांत वाईकर यांची या वेळी उपस्थिती होती.
देसरडा म्हणाले, निसर्गाचे, पर्यावरणाचे संरक्षण करणारा, महिलांना झुकते माप देणारा, त्यांचा स्वाभिमान राखणारा आणि शोषित, उपेक्षितांच्या बाजूचा विकास हवा आहे. समाजाच्या सर्वच क्षेत्रात जी बजबजपुरी वाढली आहे, त्यामुळे काही मूठभर लोकांचे भले होत आहे. कास्तकरी, कष्टकरी विकासापासून कोसो दूर आहेत. त्यासाठी राजकारण दुरुस्त होणेही आवश्यक आहे तरच देशाला भविष्य आहे. अॅड. परांजपे म्हणाले, सध्या देशाचे चित्र वाईट असल्याचे चित्र प्रसारमाध्यमातून रंगविले जात आहे. परंतु चांगल्या बाबी समोर आणल्या जात नाही. निकोप समाजासाठी आणि वंचितांना सामाजिक, आíथक न्याय मिळवून देण्यासाठी संवेदनशील मनांच्या माणसांनी पुढे आले पाहिजे. या वेळी भालेराव व गोमारे यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले.
प्रतिष्ठानविषयी कृतज्ञता
चारठाणकर पुरस्काराने आणखी उमेदीने काम करण्याचे पाठबळ मिळाल्याचे नमूद करीत पुरस्काराच्या रकमेत तेवढीच रक्कम घालून १० हजार रुपये निशिकांत भालेराव यांनी प्रतिष्ठानकडे सुपूर्द केली.

Story img Loader