सप्तशृंग गड परिसरातील दुर्मीळ औषधी वनस्पतींचे संशोधन करून जतन करण्याच्या उद्देशाने लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले निसर्ग संशोधन केंद्र लालफितीच्या कारभारामुळे अद्याप कार्यान्वित होऊ शकलेले नाही. सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील हे केंद्र वन विभागाने ताब्यात घेऊन त्वरित सुरू करावे, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील निसर्ग व पर्यावरणप्रेमी व संशोधकांनी केली आहे.
कळवण तालुक्यातील सप्तशृंग गड हे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या परिसरात अनेक दुर्मीळ वनस्पती आढळतात. त्यांचे संशोधन करून जतन करण्यासाठी निसर्ग संशोधन केंद्राची संकल्पना मांडण्यात आली होती. तथापि, या केंद्राचे काम पूर्णत्वास जाऊनही ते कार्यान्वित होत नसल्याने निसर्गप्रेमी व संशोधकांचा हिरमोड झाला आहे. वास्तविक पाहता, केंद्र कार्यान्वित झाल्यास सप्तशृंग गड परिसरातील दुर्मीळ वनौषधींविषयी संशोधक व जाणकार येथे दाखल होऊन संशोधन करू शकतात. गड परिसरात वन विभागाची मोठी जागा आहे. या जागेवर हजारो झाडे लावण्याचा मानस आहे. दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या जतनासाठी या जागेचा वापर करणे शक्य आहे. या पाश्र्वभूमीवर, हे निसर्ग संशोधन केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गडावरील निसर्गसौंदर्यात भर पाडण्याची क्षमता असणारे हे केंद्र सुरू करण्यात शासकीय विभागांची अनास्था कारणीभूत ठरली आहे.
निसर्ग संशोधन केंद्राची संकल्पना मांडली गेल्यावर वन विभागाने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले. या विभागाने ठेकेदाराची नेमणूक करून कामाचा श्रीगणेशा केला. परंतु, मध्यंतरी ते आठ महिने बंद होते. त्यामुळे संशोधन केंद्राचे काम पूर्ण होईल की नाही, अशी साशंकता ग्रामस्थांना वाटत होती.
बऱ्याच कालापव्यय झाल्यावर हे काम दृष्टिपथास आले. परंतु, केंद्राची वास्तू आणि विश्रामगृह उभारण्यापलीकडे पुढे काही हालचाल झाली नाही. लालफितीचा कारभार कसा असतो, त्याचे उदाहरण म्हणून या केंद्राकडे पाहता येईल. दुर्मीळ औषधांच्या संशोधनाच्या उद्देशाने साकारलेले हे निसर्ग संशोधन केंद्र कार्यान्वित झाले नसताना वन विभागाने याच स्वरूपाच्या आणखी एक केंद्राचे काम अंजनेरी परिसरात हाती घेतले. म्हणजे, या विभागाला खरोखर संशोधन करावयाचे आहे की, केवळ केंद्रांच्या बांधकामांचा पसारा वाढवायचा आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधी हाती घेतलेले केंद्र कार्यान्वित करणे शक्य झाले नसताना दुसऱ्या केंद्राचा अट्टहास धरणे कितपत योग्य आहे, असा सूर पर्यावरणप्रेमी लावत आहे. सप्तशृंग गडावर उभारलेले केंद्र वन विभागाने ताब्यात घेऊन कार्यान्वित करावे, अशी मागणी जिल्ह्यातील निसर्ग व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा