काही वर्षांमागे राजेश देशपांडे लिखित ‘आम्ही आलो रे’ हे धमाल विनोदी नाटक रंगभूमीवर आलं होतं. संजय नार्वेकर आणि विजय कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेलं हे नाटक मनोरंजनाचा बम्पर अ‍ॅटमबॉम्ब होता. हे दोघं भुतांच्या भूमिकेत जे काय धूमशान घालायचे त्यानं प्रेक्षक हसून हसून पार बेजार होत. ज्यांनी ज्यांनी हे नाटक त्या काळी पाहिलं असेल त्यांना आजही त्या आठवणींनी लोटपोट व्हायला होतं. या नाटकाचे सहज हजार प्रयोग होतील असं वाटलं होतं, पण कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक! अचानक नाटक बंद पडलं. कलाकारांच्या इगो प्रॉब्लेममुळे ते बंद पडल्याचं नंतर कळलं तेव्हा वाईट वाटलं. एका मस्त, रंजक नाटकाची अकाली माती झाली होती!
आज हे आठवायचं कारण पुन्हा हे नाटक नव्या नावानिशी, नव्या पेहेरावानिशी रंगभूमीवर आले आहे. ‘एका लग्नानंतरचे घोस्ट’ हे त्याचं नवं नाव! ‘अथर्व’ संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन स्वत: लेखक राजेश देशपांडे यांनीच केलेलं आहे आणि या वेळी भुतांच्या प्रमुख भूमिकेत आहेत- अभिजित चव्हाण आणि किशोर चौघुले हे आजचे विनोदवीर!
या नाटकाची गोष्ट थोडक्यात अशी:  साधारण दीडशे वर्षांपूर्वी कोकणातील एका गावातले तात्या आणि नाना खोत हे दोघं भाऊ. थोरला तात्या गावातल्या देखण्या बाया आपल्याला वश कशा होतील, या उद्योगात सदा मग्न! तर धाकटा नाना त्याच्या या ‘उद्योगा’वर नजर ठेवण्यासाठी सदासर्वकाळ त्याच्या मागावर! आपल्या वंशजांचे हे चाळे स्वर्गातल्या कूळपुरुषाला पाहवेनात. तो त्या दोघांना नाना तऱ्हेनं शिक्षा करून मार्गावर आणायचा प्रयत्न करतो, पण दोघंही लंपट आणि बनेल! पितरांचं श्राद्ध जेवलेले! ते थोडेच बधतात? शेवटी  निकराला येऊन कूळपुरुष त्या दोघांना शाप देतो : ‘तुम्ही भुतं बनून अस्वस्थपणे कायम भटकत राहाल! तुम्हाला कधीही मोक्ष मिळणार नाही.’ कूळपुरुषाच्या या शापानं दोघंही हादरतात. ‘शापातून मुक्ती दे’ म्हणून विनवणी करतात. तेव्हा कूळपुरुष दोघांना स्वतंत्रपणे उ:शाप देतो. नानाला म्हणतो, ‘तुझ्यापासून कुळकण्र्याच्या चौथ्या पिढीतल्या  मुलाचं लग्न झाल्यावर तीन महिन्यांच्या आत त्याच्या बायकोला दिवस गेल्यास तुला मुक्ती मिळेल.’ तर तात्याला सांगतो का, ‘तुझ्यापासून चौथ्या पिढीतल्या कुलकण्र्याच्या मुलाचं लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला तीन महिन्यांनंतर दिवस गेले तरच तुला मुक्ती मिळेल. त्याआधी तिला दिवस गेले तर तू असाच मुक्तीविना लटकत राहशील.’
या उ:शापानं दोघांच्या जिवात जीव येतो, परंतु त्या दोघांना माहीत नसतं की, कूळपुरुषानं उ:शाप देतानाही भलतीच पाचर मारून ठेवलीय. एकाची मुक्ती म्हणजे दुसरा लटकला!
यथावकाश कुलकण्र्याच्या चौथ्या पिढीतील आनंदाचं मुक्ताशी लग्न होतं. तात्या आणि नानांच्या भूतयोनीतून मुक्तीचा क्षण आता जवळ येऊन ठेपतो. दोघंही आनंद आणि मुक्ताच्या पहिल्या रात्रीच कामाला लागतात. नानाचं भूत त्या दोघांनी एकत्र यावं म्हणून, तर तात्याचं भूत आनंद-मुक्ताला एकमेकांपासून तीन महिने दूर ठेवण्यासाठी!
या सगळ्या झमेल्यात आनंद आणि मुक्ताची जी भयंकर ससेहोलपट होते आणि नाना व तात्या एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी ज्या शकला लढवतात, शह-काटशहाचं जे घनघोर युद्ध खेळतात, ते म्हणजे ‘एका लग्नानंतरचे घोस्ट’ हे नाटक होय!
विनोदी नाटकासाठी याहून भन्नाट कथाबीज दुसरं काय असू शकतं? लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी हे नाटक पुनश्च रंगभूमीवर आणताना काळानुरूप त्यात बरेच बदल केले आहेत. ‘आम्ही आलो रे’मधली निरागसता आणि भाबडेपणा या नव्या रूपात कटाप झालेला आहे आणि ‘कॉमेडी एक्स्प्रेस’च्या सवंग कॉमेडीचं मूळ संहितेवर आक्रमण केलं आहे. त्यामुळे ‘स्वस्त’ शारीर आणि शाब्दिक विनोदांचे फुटाणे अधूनमधून तडतडत राहतात. त्यातून ज्या कुणाचं रंजन होत असेल ते होवो, पण जाणकार प्रेक्षक मात्र त्यामुळे निश्चितपणे खंतावतो. यातल्या द्वयर्थी विनोदांत सूचकतेची मर्यादा मात्र पाळली गेली आहे, हे खरं. राजेश देशपांडे यांनी काळानुरूप केलेल्या बदलांत काही बदल चांगले आहेत. उदा. मोबाइल, फ्यूज यांसारख्या आजच्या युगातल्या गोष्टींबद्दल अनभिज्ञ असलेल्या तात्या आणि नानांना त्या गोष्टींच्या माहितीमुळे वाटणारे आश्चर्य आणि ते आपल्या परीनं त्यांचे लावत असलेले अर्थ यांतून प्रासंगिक विनोदाची कारंजी फुलतात. त्याचबरोबर दीडशे वर्षांपूर्वीची भाषा आणि आजच्या भाषेत फरक पडल्याने होणारे भाषिक विनोदही नाटकाच्या रंगतीत भर घालतात. यातलं सासूबाईंचं पात्र मात्र अगदीच सपक उतरलं आहे. (लेखनदृष्टय़ा!). ते सवंग विनोदनिर्मितीसाठी पूरक असलं तरी नाटकांचा परिणाम मात्र पातळ करतं. राजेश देशपांडे यांनी नाटकाची हाताळणी अत्यंत गतिमान केली आहे. त्यामुळे प्रेक्षकाला तार्किक विचार करण्यास वावच मिळत नाही. भुताखेतांना सर्वत्र असलेला मुक्त संचार आणि मर्त्य मानवाच्या संचारात घराच्या भिंती, दारे व खिडक्यांचा असलेला अडथळा यातूनही अभावितपणे विनोदनिर्मिती होते. तात्या आणि नानाच्या मूळ स्वभावामुळेही उत्स्फूर्तपणे विनोद घडतात. भूतयोनीत वावरतानाही त्यांचे मूळ स्वभाव कायम राहिल्याने तात्याचं भूत वासूगिरी करत राहतं आणि नाना त्याची वासूगिरी मिटक्या मारत एन्जॉय करतो. दोघांचे उ:शाप परस्परांच्या मुक्तीच्या विरोधात असल्याने ते आनंद आणि मुक्ताला ज्या प्रकारे छळतात त्यातूनही नकळत अतिशयोक्तीपूर्ण विनोदाच्या फुलझडय़ा उडतात. नाटकाच्या उत्कर्षबिंदूला तर तात्या मुक्ताच्या शरीरात आणि नाना आनंदच्या शरीरात शिरून जो काही धुडगूस घालतात, ती तर प्रत्यक्ष अनुभवण्याचीच बाब आहे. एकुणात, लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी नाटकाची हाताळणी कॉमेडी, फार्स, स्लॅपस्टिक कॉमेडी अशा सर्व प्रकारांच्या संमिश्रणातून केलेली आहे. त्यातली सवंगता थोडीशी नजरेआड केली तर नाटक प्रेक्षकांचे पैसे वसूल करतं यात शंका नाही.
प्रसाद वालावलकर यांनी गंगूचं कोकणातलं घर, त्यानंतर आनंदचा प्रशस्त फ्लॅट आणि चौपाटी ही नाटय़स्थळे वास्तवदर्शी आणि सूचक नेपथ्यातून साकारली आहेत. विशेषत:  तात्या आणि नाना या भुतांच्या मुक्त संचारासाठी आनंदच्या घराचं उभारलेलं नेपथ्य नाटकाची मागणी पुरवतंच; पण त्याचबरोबर पात्रांच्या हालचालींसाठी प्रशस्त अवकाशही उपलब्ध करून देतं. भूषण देसाई यांनी प्रकाशयोजनेतून यातल्या नाटय़पूर्ण जागा उठावदार केल्या आहेत. अमीर हडकर यांनी ‘कभी कभी मेरे दिल में’ या चित्रपटगीताच्या उपहासात्मक वापरातून नाटकाची जातकुळी प्रथमच स्पष्ट केली आहे. सागर मोरे (वेशभूषा) आणि संदीप नगरकर-प्रदीप दर्णे (रंगभूषा) यांनीही नाटकाच्या निर्मितीमूल्यांत मोलाची भर घातली आहे.
अभिजित चव्हाण (तात्या) आणि किशोर चौघुले (नाना) या दोघांनी अखंड नाटकभर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. विशेषत: किशोर चौघुले तर आपल्या भूमिकेत असे काही घुसले आहेत, की ज्याचं नाव ते! नानाची नपुंसकता न्यूनगंडाच्या पातळीवर न आणता उलट त्याकडे दुर्लक्ष करून तो दृष्टिसुखात समाधान मानतो. त्यासाठी सतत तात्याच्या मागावर राहतो. भूतयोनीतून मुक्ती मिळविण्यासाठी तो आनंद व मुक्ताला एकत्र आणण्याकरिता जंग जंग पछाडतो. त्यांच्या एकांतात तात्याने बाधा आणू नये म्हणून तो तात्याला गोष्टीत गुंतवू पाहतो तो प्रसंग तर या दोघा कलाकारांनी इतका धम्माल रंगवला आहे! किशोर चौघुले यांना विनोदाची सूक्ष्म जाण आहे. त्याचा पुरेपूर वापर त्यांनी यात केलेला आहे. तात्याचा लंपटपणा अभिजित चव्हाण यांनी सर्वागानं दर्शविला आहे. भूतयोनीतही तात्याची स्त्रीलंपटता कायम राहते. नानावरील कुरघोडीतल्या खेळातही तात्या दहा पावलं पुढं असतो. त्यामुळे नानाची सर्व प्रकारे कोंडी करून तो मुक्ती मिळवणार असं वाटत असतानाच नाटक कलाटणी घेतं. भूषण कडू यांनी गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. आनंद कुलकर्णी छचोर ढंगात सादर केला आहे. त्यांच्यावर ‘कॉमेडी एक्स्प्रेस’चा अत्यंत वाईट प्रभाव जाणवतो. अर्थात यात दिग्दर्शक राजेश देशपांडेही तितकेच दोषी आहेत. या पात्राची हाताळणी ते सभ्य पद्धतीनंही करू शकले असते. भूषण कडू यांनीही विनोदाच्या अट्टहासात वाहवत जायचं थांबवायला हवं. पल्लवी वाघ-केळकर यांनी मुक्ताची गोची मुद्राभिनयातून छान दाखवलीय. गंगू आणि सासूच्या भूमिकेत मीरा मोडक उठवळपणा सहजतेनं व्यक्त करतात. संचित वर्तक छोटय़ा छोटय़ा भूमिकांतूनही मजा आणतात.
‘एका लग्नानंतरचे घोस्ट’मधील विनोदाची सवंग मात्रा जरा कमी केली तर हे नाटक प्रेक्षकांचं भन्नाट मनोरंजन करील, हे निश्चित!   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा