राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या ‘नोकरी महोत्सव’तील प्रक्रिया गर्दीमुळे पार पडू शकली नाही. आता ही प्रक्रिया २९ ते ३१ ऑगस्ट तसेच २ व ३ सप्टेंबर रोजी टप्प्याटप्प्याने पार पाडली जाईल, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक व प्रदेश युवकचे उपाध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले.
महोत्सवास अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. महोत्सवात एकूण ४ हजार ४७० बेरोजगारांनी नावनोंदणी केली. त्यातील निम्म्या बेरोजगारांची लेखी परीक्षा काल पूर्ण झाली. उर्वरित लेखी परीक्षा व मुलाखती विस्तारित तारखेस घेतल्या जातील, त्याची माहिती नावनोंदणी केलेल्यांना मोबाइल व एसएमएसवर कळवली जाईल. एकाच वेळी सर्व युवकांना बोलावले जाणार नाही, टप्प्याटप्प्याने युवक बोलावले जातील. मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्येच घेतल्या जातील. अंतिम निवड यादी कार्यालयाबाहेर प्रसिद्ध केली जाईल. अधिक माहितीसाठी मो. ८६००००२४१८ किंवा ७७७४९६६९९४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नोकरी मिळत नसल्याने शहरातील अनेक तरुण नगर सोडून जात आहेत, याची नैतिक जबाबदारी शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी स्वीकारायला हवी, नगर एमआयडीसीच्या विकासासाठी त्यांनी विधिमंडळात आवाज उठवला असता तर बेरोजगारांवर नगर सोडून जायची वेळ आली नसती अशी टीका करून काळे म्हणाले, की एमआयडीसीच्या प्रश्नांसाठी व उद्योजकांच्या मागण्यांसाठी उद्योगमंत्री सचिन आहेर यांच्याकडे बैठक घेण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा