नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव अडीच एफएसआय देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळपास घेतल्याने या निर्णयाच्या विरोधात नवी मुंबईतील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्र्यांसमोर अक्षरश: थयथयाट घातला. यामुळे वाढीव एफएसआयचे श्रेय केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल आणि स्थानिक काँग्रेस भुईसपाट होईल अशी भीती या नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे चव्हाण यांनी प्रदर्शन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांची नावे घेऊन या वादावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असली तरी नवी मुंबईत ती कधीही दिसून आली नाही. या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे विळ्या भोपळ्याचे वैर आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना पाण्यात बघत असून कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत असे चित्र आहे. पालिका स्थापनेपासून वैर टप्याटप्याने विकोपाला गेले आहे. त्यामुळे काँग्रेसचा येथील क्रमांक एकचा शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायी पालकमंत्री गणेश नाईक हे आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत येथील काँग्रेस नेत्यांनी नाईकांच्या विरोधात खुलेआम काम केले. त्याशिवाय वाशीतील दोन पालिका पोटनिवडणुकीत तर शिवसेनेला साथ देण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे राज्यात दोन काँग्रेसमध्ये आघाडी झाली नाही तरी नवी मुंबईत ही आघाडीतील बिघाडी गेली २०वर्षे दिसून येते. त्यामुळे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नाने नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी अडीच एफएसआय पदरात पडण्याच्या मार्गावर असतानाच वाशीगाव, गोठवली, आणि नेरुळ (दाक्षिणात्य) मधील तीन आजी माजी नगरसेवकांनी बुधवारी सह्य़ाद्रीवर मुख्यमंत्र्यांना गाठून आपली नाराजी व्यक्त केली. नाईक यांच्या मनाप्रमाणे एफएसआय जाहीर केलात तर राष्ट्रवादी आणखी मजबूत होईल आणि काँग्रेस चटणीदेखील शिल्लक राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या स्थानिक नेत्यांचे काहीही ऐकून न घेता गुरुवारी होणाऱ्या सिडकोच्या कार्यक्रमात तुम्हालाही श्रेय देण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. त्यानंतर या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांचा पिच्छा सोडला. मुख्यमंत्री गुरुवारी वाशीत आल्यानंतरही एका नगरसेवकाने राजीनामा देण्याची धमकी दिली मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला भीक न घालता आघाडी सरकार असल्याची आठवण त्या नगसेवकाला करून दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नाईक यांनी तीन षटकार मारल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी असलेली नाराजी कमी होण्यास मदत होणार आहे. नाईकांच्या या लढाईत वाशीतील त्यांच्या एका नगरसेवकाची मोलाची साथ लाभली आहे. या निर्णयाची अधिसूचना अद्याप प्रकाशित झालेली नसताना नवी मुंबईत ठिकठिकाणी अभिनंदनाचे फलक झळकले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा