सॅटेलाइट सिटी, एज्युकेशनल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत गेली दोन वर्षे भरविण्यात येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमध्ये सहभागी होणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा हा चित्रपट महोत्सव यंदा २९ ते ३१ मे रोजी वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात होणार आहे. महोत्सवात मराठी विद्यार्थ्यांच्या ३० प्रवेशिका आल्या आहेत. तर देश-विदेशातील ४१० स्पर्धकांनी या महोत्सवात आपल्या लघु, दीर्घ, चित्रपट पाठविले असून त्यातील ६७ चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. या महोत्सवाला मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, लेखक, परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उत्तम भविष्यकाळ असणाऱ्या नवी मुंबईत अलीकडे काही रंगकर्मी, चित्रपटसृष्टीतील कलाकरांनी नाटय़ व चित्रपट चळवळ वाढीस लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातील एक प्रयोग म्हणून गतवर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नाशिकच्या धर्तीवर नवी मुंबईतही चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आल्याचे महोत्सवाचे आयोजक सचिन खन्ना यांनी स्पष्ट केले. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रिमा, लेखक-पटकथाकार इम्तियाज हुसेन, ज्येष्ठ छायालेखक राजेश जोशी, सिनेपत्रकार विनोद कापरी हे समीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या महोत्सवासाठी ४१० प्रवेशिका आल्या असून यांत अमेरिका, इटली, रशिया येथील चित्रपटांचा सहभाग आहे. ४१० पैकी ६७ फिल्म महोत्सवासाठी सहभागी करून घेण्यात आल्या असल्याचे सांगितले.
सामाजिक विषय हाताळणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी असून अॅनिमेशन फिल्ममध्ये अनेक लहान विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यात अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विषय खुबीने सादर करण्यात आलेले आहेत. यावर्षी मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला असून ३० प्रवेशिका आल्या आहेत. त्यातून १२ चित्रपट महोत्सवात दाखविण्यात येतील.
नवी मुंबईत हा चित्रपट महोत्सव होत असल्याने स्थानिक चित्रपटात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा पुरस्कार ठेवला जाणार असल्याचे खन्ना यांनी स्पष्ट केले. यु टय़ूबपुरत्या मर्यादित असणाऱ्या शॉर्ट फिल्मसाठी एक व्यापक व्यासपीठ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट महोत्सवातील पुरस्कार देताना गैरप्रकार केले जातात असे म्हटले जाते पण या महोत्सवात पारदर्शकता हा पहिला निकष पूर्ण केला जाणार असल्याचे हुसेन यांनी सांगितले.
अरुणा शानबाग या संघर्षांची काहणी हा चित्रपटसृष्टीसाठी आव्हानाचा विषय असल्याचे लागू व हुसेन यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई चित्रपट महोत्सवासाठी या वेळी प्रवेश मोफत असल्याने विद्यार्थी आणि चित्रपट रसिकांनी त्याचा आवर्जून अस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा