गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. यानिमित्ताने महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी नुकतेच एका बैठकीचे आयोजन करीत विविध विभागांतील उपाययोजनांचा आढावा घेतला. रस्त्यावरील खड्डे भरण्यापासून विसर्जन तलाव आणि कृत्रिम तलावांजवळ कशा प्रकारे खबरदारी घ्यावयाची या अनुषंगाने त्यांनी आधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मागील वर्षांत गणेशोत्सवाच्या काळात आलेल्या अडचणी लक्षात घेत या वेळी काय नियोजन करावे याच्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रत्येक वर्षी महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनस्थळांवर संपूर्ण व्यवस्था केली जाते. या ठिकाणी श्रींच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी फोरिक्लप ट्रॉली, पिण्याचे पाणी, मोबाइल स्वच्छतागृहे, आरोग्य पथके, निर्माल्य कलश आदी प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे विसर्जनतलावांवर सुरक्षेसाठी स्वयंसेवक व जीवरक्षकांची नेमणूक करण्यात येते. त्यानुसार यंदाच्या उत्सवाला पूरक बाबींच्या पूर्ततेसाठी आतापासूनच कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश त्यांनी दिले. गणेशोत्सवाच्या कालखंडात मंडप व कमानी उभारण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतल्यानंतर महानगरपालिकेची परवानगी विभाग कार्यालयामार्फत देण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे शहराचा सुनियोजितपणा व रस्त्यांची स्थिती अबाधित राखण्याच्या दृष्टीने गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावर स्वागत शुभेच्छा, कमानी उभारताना महानगरपालिकेच्या संबंधित विभागाची परवानगी घेऊनच त्या योग्य आकारात उभाराव्यात. तसेच त्या उभारताना रस्त्यात खड्डे करू नये, अशा मंडळांना सूचना कराव्यात असे त्यांनी सांगितले.

Story img Loader