मुंबईतील मेट्रोचा बोलबाला सुरू झाल्यानंतर नवी मुंबईतील मेट्रोचा खडखडाट कधी सुरू होणार, अशी विचारणा केली जात असून तीन वर्षांपूर्वी बेलापूर ते तळोजा या अकरा किलोमीटर अंतराच्या मेट्रो रेल्वेचे काम रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग क्रॉसिंगमुळे रखडले आहे. त्यामुळे अगोदर जाहीर झालेल्या डिसेंबर २०१४ची नवी मुंबई मेट्रो आता सुरू होण्यास डिसेंबर २०१६ उजाडणार आहे. असे स्पष्ट दिसून येत आहे. सुमारे साडेचार हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. मेट्रो मार्गासाठी लागणारी सर्व जमीन सिडकोच्या मालकीची असल्याने जमीन संपादनाची अडचण सिडकोसमोर नाही.
मुंबईत वाढणाऱ्या भरमसाट लोकसंख्येसाठी वाहतूक व्यवस्था म्हणून मोनो व मेट्रो रेल्वेचे पर्याय प्रत्यक्षात आणले गेले आहेत. दोन दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या मेट्रोला तर मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. नवी मुंबई दिवसेंदिवस झपाटय़ाने वाढत असून, नयना क्षेत्राच्या विकासानंतर ही लोकसंख्या मुंबईबरोबर तुलना करणारी ठरणार आहे. वाहतूक व्यवस्थेतील आव्हान लक्षात घेऊन सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांच्या पुढाकाराने नवी मुंबई मेट्रोची मे २०११ रोजी पायाभरणी करण्यात आली. नवी मुंबईत दिल्ली मेट्रो रेल्वे कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार सात मार्ग प्रस्तावित केले आहेत. त्यातील बेलापूर, खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर या अकरा किलोमीटर अंतराच्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली असून, या मार्गावरील छन्नमार्गचे (वायडक्ट) ७० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती विशेष प्रकल्पांचे मुख्य अभियंता एस. आर. दराडे यांनी दिली. या मार्गात ११ रेल्वे स्थानके उभारण्यात येणार आहेत. सत्रे यांनी या कामात विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे कामाला वेग आल्याने डिसेंबर २०१४ म्हणजे सहा महिन्यांनी नवी मुंबईतही मेट्रो सुरू होणार अशी घोषणा त्यांनी केली होती, पण ती हवेत विरून गेली असून, आता या मेट्रोला सुरू होण्यास दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई एवढी नवी मुंबईतील मेट्रोची गरज जाणवत नसल्याने ती उशिरा सुरू झाली, तरी नवी मुंबईकरांच्या जीवनमानावर काहीही परिणाम होणार नाही. मेट्रो येणार म्हणून खासगी बिल्डरांनी मात्र आपल्या घरांच्या किमती दुप्पट वाढवल्याचे दिसून येते. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या प्रणालीचे सुमारे तेराशे कोटी रुपयांचे मंजूर करण्यात आल्याचे समजते. यात गाडीचे डबे, सिग्नलिंग, गाडीचे नियंत्रण, विद्युत पुरवठा, कर्षण, स्काडा, ट्रकचे काम, डेपोची सामुग्री, विविध रेल्वे प्रणालीच्या घटकांच्या एकत्रित कामांचा समावेश आहे. या कामासाठी ३० महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोला अडीच वर्षे सुरू होण्यास लागणार आहेत. या मार्गात येणारे रेल्वे क्रॉसिंग, राष्ट्रीय महामार्ग, सायन-पनवेल मार्गाच्या प्राधिकरणांची विशेष परवानगी घेऊन कामे करावी लागत असल्याने विलंब होत असल्याचे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले. मोठय़ा प्रकल्पामध्ये निर्धारित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा