पावसाने निरोप घेतल्यानंतरही शहरात मलेरिया आणि डेंग्यूसदृश तापाने अक्षरश: थैमान घातल्याने संतापलेले महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी १५ दिवसांत साथ आटोक्यात आणा अन्यथा घरचा रस्ता धरायला तयार राहा, असा निर्वाणीचा इशारा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे. खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये मलेरिया, डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांच्या रांगा लागल्या असून मलेरिया नियंत्रण विभाग कुचकामी ठरल्याचे चित्र अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहे. या पाश्र्वभूमीवर टीकेचे धनी ठरलेल्या आबासाहेबांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देऊ केला आहे.
नवी मुंबईत सुरुवातीच्या काळात मलेरियाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक होते. या काळात शहरात मोठय़ा प्रमाणावर बांधकामे उभी राहात होती. त्यामुळे डासांची निर्मिती केंद्रेही मोठय़ा प्रमाणावर आढळून येत असत. आरोग्य विभागाने प्रयत्नपूर्वक योजना राबवून मलेरियाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवले. गेल्या काही वर्षांत मात्र मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाचे तीनतेरा वाजले असून काही वर्षांपूर्वी आखलेल्या र्सवकश अशा कार्यक्रमाची धुळदाण उडाली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मागील चार वर्षांत नवी मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आढळून आली आहे. महापालिकेच्या दवाखान्यात रुग्णांच्या रांगा लागल्या असून ३०० खाटांच्या रुग्णालयात ४५० रुग्ण दाखल असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खासगी दवाखान्यांमध्ये मलेरियाने दाखल असलेल्या रुग्णांचा आकडा दुपटीने वाढला आहे. अधिकारी तसेच राजकीय नेते रुग्णशय्येवर असल्यामुळे आरोग्य विभागाचे नाकार्तेपण ठसठशीतपणे पुढे येऊ लागले आहे.
धूर फवारणीचा दिखावा
मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण सातत्याने आढळू लागल्याने महापालिकेने सायंकाळच्या वेळेतही धूर फवारणी कार्यक्रम हाती घेतला आहे. महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्रोळी गावात मोठय़ा संख्येने डेंग्यूचे रुग्ण सापडू लागल्याने या परिसरातील साफसफाई यंत्रणेविषयी स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. आरोग्य विभागाने पाच वर्षांपूर्वी आखलेल्या कार्यक्रमात ऑक्टोबर २०१३ पर्यंत धूर फवारणी कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याचे ठरविण्यात आले होते. धूर फवारणीमुळे डास आटोक्यात येत नाहीत, असा अनुभव आहे. त्याऐवजी डास निर्मिती केंद्र शोधून अळी नाशकांची फवारणी हा उत्तम उपाय मानला जातो. असे असताना केवळ नागरिकांच्या समाधानासाठी सायंकाळच्या वेळेत धूर फवारणी कार्यक्रम राबवून ठेकेदारांचे भले केले जात आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
आबासाहेब उखडले
दरम्यान, मलेरिया आणि डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे टीकेचे धनी ठरलेले नवनियुक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड रोगाच्या फैलावामुळे कमालीचे संतापले असून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
काहीही झाले तरी येत्या १५ दिवसांत मलेरियाचा फैलाव रोखा, अन्यथा घरी जाण्यास तयार राहा, अशा शब्दांत आयुक्तांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी घनकचरा व्यवस्थापन तसेच मलेरिया नित्रयंण विभागाकडून संयुक्तपणे ही मोहीम राबवली जात होती. असे असताना उपायुक्त अजिज शेख यांच्या नेतृत्वाखाली असलेला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कामही फारसे प्रभावी नसल्याने मलेरियाचा फैलाव अधिक झाल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा