नवीन मुख्यालयातील पहिल्या सभेत प्राण्यांच्या हिताचा प्रस्ताव  
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या नवीन मुख्यालयातील राजमाता जिजाऊ सभागृहात पहिला प्रस्ताव नवी मुंबईकरांच्या नागरी सुविधांचा किंवा प्रशासकीय सोयींचा नसून मनुष्याचे युगानुयुगांचे मित्र मानल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या हिताचा आहे. या महिन्यातील सर्वसाधारण सभा महापौर सागर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नवीन मुख्यालयात संपन्न होणार असून या सभेत इतिवृन्तात व प्रश्नोत्तर कार्यक्रमांनंतर प्रशासनाच्या वतीने सानपाडा येथे बांधण्यात येणाऱ्या शहरातील पहिल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे गाय व बैल यांसारखे प्राणी बाळगणारे शेतकरी तसेच नागरिकांना त्यांच्या उपचारांसाठी वेळोवेळी मुंबई गाठण्याची वेळ येणार नाही. पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्राबरोबरच कर्जत, मुरबाड, पेण, खोपोली या भागांतील जनावरांनाही त्याचा लाभ होणार आहे.
नवी मुंबई पालिकेने २२ वर्षांनंतर का होईना स्वत:ची भव्य इमारत बेलापूर सेक्टर १५ येथे बांधली आहे. मुंबई पालिकेची ब्रिटिशकालीन इमारत वगळता राज्यात अशी दुसरी इमारत नाही. या इमारतीसमोर उभारण्यात आलेला २२५ फूट राष्ट्रध्वज हा तर देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज म्हणून गणला जात आहे. सहा वर्षांत १६० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्रीन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी फेब्रुवारी महिन्यातील पहिली महासभा आयोजित करण्यात आली आहे. अद्याप प्रशासकीय कामकाज या इमारतीतून चालविले जात नाही. स्थापत्यशास्त्रातील काही जुजबी कामे अद्याप बाकी आहेत. लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी या इमारतीचे उद्घाटन उरकून घेण्यात आले, पण या इमारतीतील दोन सभागृहे तयार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याची मासिक सभा या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्या सभेत पहिला प्रस्ताव पशुवैद्यकीय इमारतीचा मंजूर होणार आहे. आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी हा प्रस्ताव पटलावर ठेवला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे या सभागृहात पूर्ण संख्याबळ असल्याने हा प्रस्ताव मंजूर होण्यास कोणतीही अडचण नाही. या अत्याधुनिक आणि आधुनिक इमारतीमध्ये भविष्यात वाढणाऱ्या नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन मुंबई पालिकेएवढे म्हणजेच २२० नगरसेवकांना सामावून घेऊ शकेल, इतके मोठे सभागृह बांधण्यात आले आहे. नवी मुंबई पालिकेच्या नगरसेवकांची संख्या केवळ ९० आहे. या आलिशान सभागृहात मंजूर होणारा पहिला धोरणात्मक प्रस्ताव ऐतिहासिक ठरणार असून तो मानवी सुविधांचा नसून प्राण्याच्या सोयीचा आहे, हा एक योगायोग मानला जात आहे. त्यामुळे या प्रस्तावाला अधिक महत्त्व आहे. पालिका सानपाडा सेक्टर २४ येथील ९२० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंड क्रमांक ५ व ६ वर अद्ययावत कत्तलखाना व पशुवैद्यकीय रुग्णालय उभारणार होती. येथील रहिवाशांनी कत्तलखान्याला तीव्र विरोध केल्याने आता या ठिकाणी केवळ पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सिडकोने हा भूखंड पालिकेला कत्तलखाना बांधण्यासाठी दिला होता, पण येथील रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन पशुवैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले असून तसा वापरबदल केला जाणार आहे. नवीन इमारतीत हा मंजूर होणारा पहिला ठराव ठरणार आहे.

Story img Loader