नवी मुंबईत आणखी ४५१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. यासाठी १७ कोटी ३५ लाख ४० हजार ३४६ रुपये खर्च होणार आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात २६८ सीसीटीव्ही कॅमेरे शहारातील मुख्य चौक, बाजारपेठा, बस डेपो, रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर, पाचबीच रोड, ठाणे- बेलापूर मार्ग तसेच जास्त वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
डिसेंबर २०१२ पासून हे कॅमेरे लावल्यामुळे पालिका क्षेत्रातील गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसला असून, पोलिसांनादेखील गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी त्याची मोठय़ा प्रमाणात मदत झाली. आतापर्यंत ३९६ गुन्ह्य़ांमधील चित्रफीत उपलब्ध झाल्यामुळे ६३ गुन्हे सिद्ध होण्यास मदत झाली आहे. तर ३३३ गुन्हे तपासण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस व नगरसेवकांनी शहरातील अन्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार सह शहर अभियंता जी. व्ही. राव यांनी हा प्रस्ताव आयुक्तांमार्फत मंजुरीसाठी सभागृहापुढे आणला होता. यामध्ये ४५१ कॅमेरे बसविणे, लीजलाइन भाडे, कॅमेरे मुख्य यंत्रणेशी जोडणे, दुरुस्ती व इतर खर्च यासाठी १७ कोटी ३५ लाख ४० हजार ३४६ रुपये लागणार असून, या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे.

Story img Loader