उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांमधील फूट टाळण्यासाठी प्रमुख पक्ष, पक्षाचे एबी फॉर्म देण्याचे टाळत असल्याचे चित्र असताना देशातील एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने नवी मुंबई पालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर झाली असून ते निश्चितपणे कामाला लागले आहेत.
या व्यतिरिक्त शिवसेना, राष्ट्रवादी, आणि भाजपमध्ये एका प्रभागात तीन ते चार उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले असून एकाच पक्षाचे अनेक कार्यक्रम होताना दिसत आहेत.
देश आणि राज्य पातळीवरील काँग्रेसला बुरे दिन येण्याअगोदर त्याची प्रचीती नवी मुंबईत दहा वर्षे अगोदर आली होती. त्यामुळे ‘काँग्रेस’ला भुईसपाट करण्यासाठी ‘काँग्रेसच’ पुरेशी आहे या काँग्रेसमधील म्हणीचा प्रत्यय नवी मुंबईत येत होता. येथील स्थानिक नेत्यांच्या लाथाळ्या, वैर आणि विश्वासघात यामुळे काँग्रेसची नगरसेवक संख्या तुलनेने वाढण्याऐवजी प्रत्येक पाच वर्षांत घटली आहे. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ८९ प्रभागांपैकी केवळ दोनच प्रभागांत आघाडीवर आहे.
 त्यामुळे पक्षाला कार्यकर्ते दुर्बीण लावून शोधावे लागत असून पालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी फारशी चुरस नाही, मात्र उमेदवारीसाठी ३६५ अर्ज आले आहेत. यात हवश्यागवश्यांना उमेदवारी देऊन अवलक्षण करण्यापेक्षा सक्षम आणि बऱ्यापैकी माहितीतील चेहरा असलेल्या उमेदवारांची उमेदवारी अप्रत्यक्षरीत्या जाहीर करण्यात आली आहे. त्यात नेरुळच्या संतोष शेट्टी यांना दोन उमेदवार निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांनी त्यांचा प्रचार सुरू केला आहे.
हीच स्थिती वाशीत अनिल कौशिक यांच्या पत्नी सुदर्शना कौशिक, नगरसेवक अविनाश लाड हे उमेदवार केव्हाच कामाला लागले असून प्रभागात ७० टक्के संपर्क पूर्ण केला आहे. घणसोलीत दीपक पाटील, ऐरोलीत अंकुश सोनावणे यांना हिरवा कंदील देण्यात आला आहे.
त्यामुळे शिवसेना भाजप, राष्ट्रवादीसारखे कार्यकर्त्यांना झुलवत न ठेवता कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे या उमेदवारांना सात ते आठ हजार मतदारांपर्यंत जाण्यास मुबलक वेळ मिळत असल्याचे चित्र आहे.
इतर प्रमुख पक्षांप्रमाणे आमच्याकडेही इच्छुकांची संख्या जास्त आहे, पण त्या कार्यकर्त्यांना ताटकळत न ठेवता कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हा भाग काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. ते दिवस पुन्हा येण्याची आम्हाला आशा आहे. आमचे संभाव्य उमेदवार कामाला लागले असून त्यांचा ७० टक्के प्रचार झालेला आहे. ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवार होते. त्यांना एकत्र बसवून एकाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे चित्र स्पष्ट झाले आहे. आमची या वेळी निर्णायक दोन अंकी संख्या असणार आहे
    -दशरथ भगत,
                        अध्यक्ष, काँग्रेस , नवी मुंबई

Story img Loader