महापे एमआयडीसीतील आदिवासीबहुल, तळवली, घणसोली, कोपरखैरणे ग्रामीण व शहरी भाग या वीस प्रभागांत येत आहेत. या विभागातील घणसोली प्रभाग क्रमांक ३२ मध्ये मोठी रंजक लढाई होणार असून काका-पुतणे आमनेसामने उभे ठाकले आहेत. एकेकाळी गळ्यात गळा घालून फिरणारे हे काका-पुतणे आता निवडणुकीदरम्यान एकमेकांचे शत्रू बनले आहेत. नगरसेवक काका संजय पाटील (अंकल) यांचा पुतण्या प्रशांत पाटील सामना करणार आहे. या लढतीबरोबरच कोपरखैरणे येथील प्रभाग क्रमांक ४० मध्ये लक्षवेधी निवडणूक होणार आहे. चतुर नगरसेवक म्हणून संपूर्ण शहरात ओळखले जाणारे शिवराम पाटील हे राष्ट्रवादीचे केशव म्हात्रे यांच्या बरोबर थेट लढत देणार आहेत. पाटील यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला असून ते गेली चार सत्र नगरसेवक आहेत. त्यांची पत्नी अनिता पाटील या शेजारच्या प्र. क्र. ३९ मध्ये निशा पाटील यांच्याबरोबर लढणार आहेत. या दोन प्रमुख लढतीबरोबरच आकाशगंगा सोसायटीच्या पुनर्बाधणीसाठी संघर्ष करणारे देवीदास हांडेपाटील हे नवोदित भाजपच्या सागर कदम यांच्या विरोधात उभे आहेत. कोपरखैरणे सेक्टर ७, १५, १६ बनलेल्या प्रभाग क्रमांक ४४ मध्ये राष्ट्रवादीच्या अॅड. भारती पाटील यांच्यासमोर दोन अपक्ष उमेदवार प्रिया गोळे व राजश्री शेवाळे यांचे आव्हान उभे ठाकले आहे. घणसोलीत माजी नगरसेवक निवृत्ती जगताप यांचा पुन्हा कस लागणार असून भाजपच्या रवी जगताप यांच्याबरोबर संघर्ष करणार आहेत. राष्ट्रवादीच्या माजी महिला अध्यक्षा कमल पाटील यांनी तिकीट वाटपाच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीला रामराम ठोकून सेनेत प्रवेश करून उमेदवारी पटकावली आहे. त्यांची लढत नगरसेवक संजय पाटील यांची पत्नी छाया पाटील यांच्याबरोबर आहे. याशिवाय घणसोली घरोंदा येथील मनसेचे माजी सचिव संदीप गलुगुडे यांची पत्नी मंदा यांची लढत सेनेच्या दीपाली सकपाळ यांच्याबरोबर आहे. प्रभाग क्रमांक ३६ मध्ये सेनेचे बंडखोर विभागप्रमुख घनश्याम मढवी यांच्या पत्नी ललिता मढवी या प्रशांत पाटील यांची पत्नी सुवर्णा पाटील यांच्याबरोबर लढणार आहेत. या प्रभागात नातेवाईकांमध्ये लढाई आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा