देशातील प्रमुख शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचा विडा मोदी सरकारने उचलला असून राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. या यादीत सर्वप्रथम नियोजनबद्ध शहर म्हणून नवी मुंबईचा विचार करण्यात आला असून सिडकोपाठोपाठ नवी मुंबई पालिकेने आपल्या क्षेत्रासाठी स्मार्ट सिटीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आणखी ४०० सीसीटीव्ही कॅमेरे व वायफाय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अग्रवाल यांनी काही महिन्यांपूर्वी सिडको मुख्यालयात एक बैठक घेऊन नवी मुंबई स्मार्ट सिटी बनविण्यासाठी काय तयारी करायला हवी याची माहिती दिली. त्यानुसार सिडको कामाला लागली असून सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत खारघर, पनवेल, कळंबोली या सिडको क्षेत्रात ४९३ सीसीटीव्ही, आपत्कालीन संपर्क यंत्रणा, लोकाभिमुख संपर्क आणि दिशाफलक या कामांची निविदा ठेवण्यात आली आहे. सिडकोला सीसीटीव्ही बसविण्यापासून तयारी करावी लागणार आहे. याउलट, नवी मुंबई पालिकेने शहरात २६२ सीसीटीव्ही एक वर्षांअगोदर बसविले असून त्याद्वारे पोलीस अनेक गुन्ह्य़ांची उकल करू शकले आहेत.
नुकतेच ई-चलान पाठविण्यास सुरुवात करण्यात आली. याशिवाय पालिकेच्या आणखी ४०० सीसीटीव्ही शहराच्या कानाकोपऱ्यात बसविण्याचे विचाराधीन आहे. याशिवाय स्मार्ट सिटीसाठी वायफाय सुविधा बसविली जाणार असून नवी मुंबईतील नागरिक घरबसल्या बँकिंग, खरेदी, चित्रपट पाहणे यांसारखी कामे करू शकणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर होणारा परिणाम, वाहतूक कोंडी, प्रदूषण यावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे पालिका प्रशासनाचे मत आहे. वायफायमुळे ई-एज्युकेशन, ई-मेडिकल, व्हच्र्युअल क्लासरूमसारख्या सुविधा घरबसल्या देता येणार आहेत. यामुळे नवी मुंबईतील एखाद्या संस्थेने किंवा व्यक्तीने अमेरिकेतील भारतीयाला संगीत किंवा योगाचे धडे दिल्यास नवल वाटणार नाही. यासाठी पालिकेने खूप मोठय़ा प्रमाणात इंटरनेट सुविधा द्यावी लागणार आहे. फोरजीची निविदा सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे शहरातील इंटरनेट सुविधा १०० पटींनी जोरात सुरू होणार आहे. बंगळुरूनंतर नवी मुंबई हे खऱ्या अर्थाने हायफाय आणि वायफाय होणारे शहर असून हैदराबादच्या एका सनदी अधिकाऱ्याच्या संस्थेने नुकतीच नवी मुंबईला भेट देऊन हे शहर स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे सर्व सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे.
स्मार्ट सिटीसाठी नवी मुंबई पालिकाही तयारीला
देशातील प्रमुख शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचा विडा मोदी सरकारने उचलला असून राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
First published on: 12-08-2014 at 06:50 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipalalso preparing for the smart city