नवी मुंबई पालिकेला योग्य पाणी नियोजन, चांगल्या मलनि:सारण वाहिन्या याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान पुरस्कार मिळाले असतील, पण हे पुरस्कार स्वीकारण्यास पालिका लायक आहे असे मी मानत नाही. हे शहर तर वासरात लंगडी गाय शहाणी असल्यासारखे आहे. नवी मुंबईत बऱ्याच सुविधा उभारण्याची गरज असल्याचे मत पालकमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी सानपाडा येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
बिल्डर असोशिएशन ऑफ नवी मुंबईच्यावतीने पामबीच मार्गावर सानपाडा येथे चार दिवसीय मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीतच त्यांनी पालिकेला घरचा आहेर दिला. नवी मुंबईचा केवळ ५० टक्के विकास झाला असून हे शहर अजून पूर्णत्वास गेलेले नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही या शहराला देशातील सर्वात्तम शहर म्हणून नावाजले आहे, पण मी तसे म्हणणार नाही, असेही ते म्हणाले.
भविष्यात तिप्पट लोकसंख्या वाढीची अपेक्षा असणाऱ्या या शहराचे आत्ताच नियोजन करणे आवश्यक असून त्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी कर्जरुपाने उभारला जाणार असून त्यासाठी जागतिक बॅक कर्ज देण्यास तयार असल्याची माहिती नाईक यांनी यावेळी दिली. पर्यावरणाचा प्रश्न फास्ट ट्रॅकवर सोडविण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटणार असून या शहरात पर्यावरणावरुन अनेक प्रकल्प रखडले असल्याची जाणीव आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबईच्या विकासात येथील बिल्डरांचे योगदान मोठे असून अनेक इमारतीचे बांधकाम पर्यावरण ना हरकत प्रमाणपत्रासाठी रखडले असल्याचे बिल्डर असोशिएशनचे सचिव देवांग त्रिवेदी यांनी सांगितले. बिल्डरांचा वेळ प्रश्न सोडविण्यात जात असून नवी मुंबईतील जमीन आता विकासाच्या दृष्टीने संपली असल्याने सिडकोची हद्द खोपोलीपर्यत वाढविण्यात यावी अशी भावना व्यक्त करण्यात आली. या प्रदर्शनात एकूण १२५ विकासकांनी भाग घेतला असून १८५ स्टॉल उभारण्यात आले आहेत.
गतवर्षी एक लाख ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट दिली होती. या वर्षी ही संख्या सव्वा लाख होईल असा आशावाद अध्यक्ष एम. सी. सनी यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने येत्या काळात तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक रिअल इस्टेट मध्ये होईल असेही ते म्हणाले.

Story img Loader