मुंबईत २६ जुलैच्या नैसर्गिक आपत्तीनंतर शहर आणि गावांवर ओढवणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन शासनाने सर्व स्थानिक प्राधिकरणांना कायमस्वरूपी आपत्कालीन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबई पालिकेच्या जुन्या मुख्यालयातील आपत्कालीन कक्षाला स्थलांतरित होण्यास अद्याप मुर्हूत लाभला नसल्याने हा कक्ष आजही जुन्या मुख्यालयात आहे. योग्य नियोजन नसल्याने नेमका आपत्कालीन कक्षच अद्याप स्थलांतरित नसल्याचे दिसून येते.
नवीन मुख्यालयात कक्षातील सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मुंबईत कोसळलेला २६ जुलैचा प्रलंयकारी पाऊस, २६ नोव्हेंबरचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला किंवा मंत्रालयाला लागलेली आग यामुळे राज्यातील सर्व स्थानिक प्राधिकरणांनी २४ बाय ७ काळासाठी आपत्कालीन कक्ष सुरू ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याप्रमाणे सर्व नगरपालिका, पालिका, जिल्हा परिषदा यांनी असे कक्ष सुरू केलेले आहेत.
नवी मुंबई पालिकेनेही जुन्या मुख्यालयाच्या तळमजल्यावर प्रवेशद्वाराजवळ असा कक्ष स्थापन केला असून त्यात एक अभियंता, अग्निशमन दलाचे चार जवान, एक लिपिक आणि एक शिपाई असा कर्मचारी वर्ग कायमस्वरूपी ठेवला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेअगोदर नवीन मुख्यालयाचे उद्घाटन आटोपून घेण्यात आले. त्यानंतर दीड महिना या मुख्यालयातील कामकाजाची कटकट सुरू होती. डॉ. बाबासाहेब आंबडकेर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे मुख्यालय पूर्णपणे स्थलांतरित करण्यात आले, पण आपत्कालीन कक्ष स्थलांतरित करण्याचे राहून गेले.
आपत्कालीन कक्षासाठी लागणाऱ्या स्वतंत्र  सुविधांचा अद्याप पत्ता नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यात हे नवीन मुख्यालय मध्यवर्ती वातानुकूलित असल्याने एका कक्षासाठी ही यंत्रणा दिवसरात्र सुरू ठेवावी लागणार होती असे नंतर लक्षात आले. त्यामुळे येणाऱ्या विजेचे बिल पालिकेला परवडणारे नव्हते. त्यावर उपाय म्हणून विंडो वातानुकूल यंत्र लावून कक्षनिर्मिती करण्यात येत असून त्यात दूरध्वनी बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे मुख्यालय आहे, पण आपत्कालीन कक्ष जागेवर नसल्याचे चित्र नवीन मुख्यालयात दिसून येत आहे.
निसर्गाचा कोप आता कधीही होत असल्याने आपत्कालीन यंत्रणा मुख्यालयाच्या जवळ असणे क्रमप्राप्त आहे, पण सध्या मुख्यालय एकीकडे आणि आपत्कलीन सेवा दुसरीकडे असे चित्र दिसून येत आहे.

Story img Loader