भरधाव मोटारसायकलवर येऊन मंगळसूत्र लंपास करणाऱ्या टोळ्यांचा सुळसुळाट बडय़ा शहरात झाला असल्याचे अनेक वेळा पाहिले गेले आले आहे. पण सायकलवरून मंगळसूत्र चोरणाऱ्या एका बिलंदर चोरटय़ाला रबाले पोलिसांनी जेरबंद केले आहे. वाडय़ाहून पहाटे पाच ते सात वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईत येऊन सर्वप्रथम एखादी सायकल चोरून नंतर त्या सायकलवरून मॉर्निग वॉक जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविण्याची शंकर नाडर याची अनोखी पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोन्याचा भाव वधारल्यापासून घरफोडय़ा करण्यापेक्षा एखाद्या मंगळसूत्रावर हात मारल्यानंतर काही दिवसांच्या उदरनिर्वाहाची गरज भागत असल्याचा अनुभव आल्यानंतर अनेक सराईत चोरटय़ांनी मंगळसूत्र चोरीला जीवनाचे सूत्र करून टाकले आहे.
त्यामुळे बडय़ा शहरात दिवसागणिक एखादी तरी मंगळसूत्र चोरीची घटना नोंद होत आहे. असे असतानाही नागरिकांनी सोने घालण्यालाही मात्र अद्याप पायबंद घातलेला नाही.
त्यामुळे मंगळसूत्र चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. यात आता मॉर्निग वॉकला जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करण्यात आले  
आंध्र प्रदेशातील  शंकर गणेश नाडर हा ४३ वर्षीय बेरोजगार अशाच प्रकारे सोनसाखळ्यावर हात मारत होतो. चार दिवसापूर्वी रबाले पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ गावडे यांनी सकाळच्या गस्तीवर असताना या नाडरच्या मुसक्या बांधल्या. त्यावेळी त्यांनी चोरी करण्याची सांगितलेली पद्धत थक्क करणारी आहे. हा नाडर वाडय़ाहून पहाटे लवकर नवी मुंबईतील मॉर्निग वॉक ठिकाणांवर टेहळणी करण्यास येत असे.
दुसऱ्या दिवशी येणाऱ्या महिलांची पूर्ण माहिती घेतल्यानंतर एखाद्या शाळेबाहेर उभी असणारी सायकल तो चोरीत असे. त्यानंतर त्याच सायकलचा वापर सोनसाखळी चोरीसाठी केला जात असे.
त्यानंतर काही अंतरावर ही सायकल सोडून देऊन हा चोर परागंदा होत होता. त्याच्याकडून चार चोरींचा ठावठिकाणा लागला असून आणखी सायकल आणि सोनसाखळी चोऱ्यांचा पत्ता लागण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोजरे यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai police arrested chain snatcher