नवी मुंबईत रस्ते अपघातांचे प्रमाण अलीकडे दिवसेंदिवस वाढत असून या संदर्भात वाहनचालकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पहिल्यांदाच शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी ३५ स्पर्धकांनी भाग घेतला असून या शॉर्ट फिल्मसाठी सीट बेल्ट, मोबाइल वापर, ड्रक अ‍ॅन्ड ड्राइव्ह, भरधाव वेग यांसारखे विषय निवडण्यात आले आहेत.
राज्यात अशा प्रकारची स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात येत असून या स्पर्धेत एखादी फिल्म परीक्षकांना सर्वोत्तम वाटल्यास तिची रिमेक करून शहरातील सर्व चित्रपटगृहांत दाखविण्याचा विचार वाहतूक पोलीस करीत आहेत.राज्यात चार जानेवारीपासून रस्ते सुरक्षा पंधरवडय़ाची सुरुवात होत आहे. नवनवीन संकल्पनांचा नेहमीच आविष्कार करणारे उपायुक्त (वाहतूक) विजय पाटील यांनी या वर्षी रस्ते सुरक्षा या विषयावर शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित केली आहे.