रस्ते अपघातामध्ये जखमींना तातडीची प्राथमिक उपचारांची मदत करून त्यांचे प्राण वाचवण्यात यश यावे याकरिता फोर्टिस रुग्णालय, वाशी यांच्या वतीने नुकतेच नवी मुंबई वाहतूक पोलिसांना प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पोलिसांच्या आरोग्य चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये पोलिसांना प्रदूषणाची बाधा झाल्याने विविध आजार जडल्याची लक्षणे आढळून आली आहेत.
अपघाताच्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचणारी व्यक्ती म्हणजे शक्यतो वाहतूक पोलीस असते आणि जखमींना आणीबाणीच्या काळात मदत करणारी व्यक्तीदेखील तीच असते. त्यादृष्टीने जखमींना तातडीची प्राथमिक उपचार मदत देण्यासाठी वाहतूक पोलिसांना सक्षम करणे गरजेचे असल्याने वाशीच्या फोर्टिस रुग्णालयाच्या वतीने गुरुवारी नवी मुंबई वाहतूक शाखेच्या पोलिसांकरिता इमर्जन्सी आणि ट्रामा मॅनेजमेंट प्रशिक्षण शिबीर राबवण्यात आले. या वेळी वाहतूक शाखेचे उपआयुक्त अरविंद साळवे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. वाहतूक शाखेतील ३३ पोलिसांनी या शिबिरात सहभाग घेतला. त्यांना फोर्टिस रुग्णालयाच्या वतीने डॉ.प्रशांत छाजेड आणि फिजिशियन अक्षय छल्लनी यांनी अपघातामधील जखमींना कशा प्रकारे तातडीचे प्राथमिक उपचार द्यावेत यांचे प्रशिक्षण दिले. तर पोलिसांच्या करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये धाप लागणे, श्वास घेण्यात अडचण, खोकला अशी लक्षणे दिसून आली. काहींना अनियमित रक्तदाबाचा त्रास असल्याचे दिसून आले.

Story img Loader