नवी मुंबई शहरामध्ये महापालिकेच्या हद्दीत ११ लाख लोकसंख्या वास्तव्यास आहेत. त्यांच्या प्रवासाच्या दृष्टीने असलेली रेल्वे प्रवासी सेवा अनेक समस्यांनी गुरफटली गेल्याने त्याचा त्रास येथील चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. मोठय़ा संख्येने चाकरमानी मुंबई व आसपासच्या उपनगरात नोकरी व कामधंद्यानिमित्त जात असतात. या चाकरमान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून कोटय़वधी खर्च करून उभारण्यात आलेली आलिशान रेल्वेस्थानके सध्या समस्यांची आगार बनली आहेत.
नवी मुंबईत जाण्या-येण्यासाठी पनवेल ते मुंबई आणि वाशी ते ठाणे असा हार्बर मार्ग तयार करण्यात आला आहे. या रेल्वे मार्गावर १५ रेल्वे स्थानके आहेत. नवी मुंबईतील या रेल्वे स्थानकांवर ९०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र मार्गावर ऐरोलीनजीक रेल्वेची वेगमर्यादा झोपडी वसाहतीमुळे मंद ठेवावी लागते. ठाणे-वाशी मार्गावरील अवघ्या १७ मिनिटांच्या या प्रवासांसाठी अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. मध्यंतरी रबाले रेल्वे स्थानकांच्या आसपास लोकल थांबली असताना एक महिलेची पर्स खेचण्यात आली होती. अचानक लोकल सुरू झाल्यावर ही महिला धावत्या लोकलमधून खाली पडल्याने उपचारादरम्यान सदर महिलेला जीव गमवावा लागला होता. तर अशीच एक घटना एका महाविद्यालयीन तरुणाच्या बाबतीत घडली. या तरुणावर प्रवासाच्या दरम्यान गर्दुल्ल्यांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ऐरोलीतील या तरुणाचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटनांमुळे आजदेखील नवी मुंबईतील रेल्वे सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून येते.
रेल्वे मार्गालगत संरक्षण भिंत बांधल्यानंतरदेखील नागरिक रेल्वे मार्ग ओलांडून जातात. परिणामी, या नागरिकांना जीव गमवावा लागतो. यासाठी ठोस उपाययोजना असल्या पाहिजेत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तुभ्रे रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांचा व झोपडय़ांचा विळखा पडला असून त्यावर कारवाई करण्याचे टाळले जात आहेत. नवी मुंबईतील करोडो रुपये खर्चून बांधलेल्या रेल्वे स्थानकामधील सार्वजनिक शौचालय देखभालीअभावी दरुगधीमय झाली आहे. तर कोपरखरणे रेल्वे स्थानकांच्या मागील बाजूस अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचा घोळका नेहमीच बसलेला असतो. मात्र पुरेशा पोलीस बळाअभावी अशा अपप्रवृत्तीना अटकाव केला जात नाही.
तुभ्रे रेल्वे स्थानक सिडनी रेल्वे स्थानकांच्या धर्तीवर बांधल्याची कौतुकांची थाप सिडको नेहमीच आपल्याच पाठीवर मारून घेत असते. मात्र या रेल्वे स्थानकांमध्ये समोरच्या झोपडपट्टीतील नागरिक आराम करण्यासाठी वापर करताना दिसून येतात. रबाले रेल्वे स्थानकांमधील छताचा पत्रा अचानक पडल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. यामुळे रेल्वे स्थानकांच्या दर्जाचा प्रश्न समोर आला आहे. भविष्यात वाढीव डब्यांच्या रेक्स हार्बर रेल्वे मार्गावर पुरवल्या जाणार आहेत. यासाठी फलाटाची लांबी वाढवण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होईल, असा सवाल नागरिक करीत आहेत. इंडिकेटर, अपुऱ्या तिकीट खिडक्या या समस्या सुरुवातीपासून ‘जैसे थे’च आहे. अपंग प्रवाशांकडून स्वतंत्र मार्गिका ही जुनीच मागणी रेटली जात आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर अपंगासाठी पुरेशा सोयी नसल्याचा आरोप अपंग व्यक्तीच्या संघटनांकडून केला जात आहे. वाशी-ठाणे रेल्वे मार्गावर पिण्याच्या पाण्याची व खाद्यपदार्थाच्या स्टॉलची समस्या सर्वच रेल्वे स्थानकांवर आहे. अनेक पंखे नादुरुस्त असल्याने प्रवाशांना रणरणत्या उन्हात रेल्वेची प्रतीक्षा करावी लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा