काहीही झाले तरी ठाणे लोकसभा मतदारसंघावर यंदा भगवा फडकावयचा या इर्षेने पालकमंत्री गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यात भला मोठा मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ वाढविण्याचे बेत आखणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना ‘मातोश्री’वरील नकारघंटेमुळे चांगलाच धक्का बसल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षप्रमुखांच्या मेळाव्याला पावसाचा व्यत्यय नको म्हणून ऐरोलीतील एका मैदानात काही लाखांचा चुराडा करत आलिशान असा शामियानाही उभारण्यात आला होता. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथील शिवसैनिकांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. मात्र, ऐन वेळेस ‘साहेब येणार नाहीत’, असा निरोप आला आणि शिवसैनिकांच्या उत्साहावर पाणी फिरले. पक्षनेतृत्वाकडून सततच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे आधीच अस्वस्थ असलेले नवी मुंबईचे शिवसैनिक तर या प्रकारामुळे कमालीचे अस्वस्थ झाल्याचे बोलले जाते.
ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाण्यातील तीन विधानसभा मतदारसंघांसह नवी मुंबईतील बेलापूर, ऐरोली आणि मीरा-भाईंदर येथील एक असे एकूण सहा मतदारसंघ मोडतात. ठाणे परिसरात सर्वाधिक साडेनऊ लाख, नवी मुंबईत सुमारे सात लाख तर मीरा-भाईंदर येथे साडेतीन लाखांच्या घरात मतदार आहेत. ठाणे शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असले तरी नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर परिसरातील मतांचे गणित लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईतून विजय चौगुले यांना उमेदवारी देताना पालकमंत्री गणेश नाईक यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्का द्यायचा, अशी व्यूहरचना शिवसेनेने आखली होती. मात्र, चौगुले यांच्यावर गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे आरोप झाल्याने ठाण्यातील शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात त्यांना फटका सहन करावा लागला. त्यामुळे गेल्या वेळची चूक पुन्हा करायची नाही, असे शिवसेनेच्या गोटात ठरते आहे. उमेदवार ठाण्यातून द्यायचा आणि नवी मुंबई, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षबांधणी सुरू करायची, असा विचार शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केला आहे. याचा एक भाग म्हणून ऐरोली शहरात ठाणे लोकसभा मतदारसंघातील गटप्रमुखांचा एक मेळावा घेण्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ठरवले होते. गेल्या काही काळापासून नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि ‘मातोश्री’ दरम्यान फारसे सख्य नसल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नवी मुंबईकडे फारसे लक्ष देत नाही, अशी येथील नेत्यांची तक्रार आहे. गणेश नाईकांसारख्या मातब्बर नेत्याशी लढताना ‘मातोश्री’ची साथ लाभत नाही, असा एकंदर सूर नवी मुंबई शिवसेनेत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिकांची तक्रार दूर व्हावी, यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ऐरोलीत आणून गटप्रमुखांचा भला मोठा मेळावा घेण्याची तयारी ठाण्यातील नेत्यांनी सुरू केली होती. विजय चौगुले यांना यासंबंधी तयारीच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. पक्षप्रमुखांच्या कार्यक्रमाला पावसाचा व्यत्यय नको म्हणून ऐरोली येथील सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानात आलिशान असा शामियाना उभारण्यात आला. त्यासाठी लाखो रुपयांचे पाणी करण्यात आले. उद्धव यांच्या स्वागताचे होर्डिग, बॅनर कोठे उभारायचे ते ठरले. भगव्या झेंडय़ांची आरास उभारण्यासाठी चौकही निश्चित करण्यात आले आणि अचानक ‘साहेब येणार नाहीत’ असा निरोप आला. पक्षप्रमुखांच्या नकारामुळे नवी मुंबईतील शिवसेनेत कमालीची नाराजी पसरली असून ठाण्यातील नेतेही गडबडले आहेत.

Story img Loader