शहरात महापालिकेने करोडो रुपये खर्च करून उभारलेल्या स्कॉयवॉकचा फायदा नागरिकांना कमी तर भिकारी आणि प्रेमीयुगुलांना अधिक होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकामंध्ये संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी बसणारे भिकारी, गर्दुल्ले, जुगारी, फेरीवाले आणि प्रेमी युगुलांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तुर्भे येथील स्कॉयवाकवर भाजीविक्रेते, मोबाइल विक्रेते यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे नागरिकांना या ठिकाणाहून चालताना नाहक त्रास सहन करावा लागतो. कोपरखरणे येथील स्कॉयवाकवर जुगाराचे फडच रंगत असल्याचे दिसते. वर्दळ नसलेल्या स्कॉयवॉकवर प्रेमी युगुलांचे गर्दी होत असून त्यांचे तेथे अश्लील चाळे सुरू असल्याचे पाहायला मिळते. ऐरोली नाक्याजवळील स्कॉयवाकवर भिकारी व गर्दुल्ले दिवसादेखील ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे या ठिकाणाहून शाळेतून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. दिवागाव सर्कल येथील स्कॉयवाकवर भटकी कुत्री तसेच प्रेमी युगुले व भिकाऱ्यांचादेखील या ठिकाणी वावर असतो. त्यामुळे नागरिक स्कॉयवाकवरून जाण्याऐवजी रस्ता ओलांडून जाणेच पसंद करतात.
*  स्कॉयवाकवर प्रेमी युगुले अश्लील चाळे करत असतात. त्यामुळे अक्षरक्ष: मान खाली घालून येथून यावे लागते. तसेच पायऱ्यांवर बसत असल्यामुळे तिथून जातानाही त्रास सहन करावा लागतो. -जयश्री करमोडा, नागरिक
* स्कॉयवाकवर भिकारी व गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. जुगारीदेखील या ठिकाणी जुगाराचे डाव मांडून बसतात. त्यामुळे स्कॉयवाक रस्ता ओलांडणाऱ्या प्रवांशासाठी आहे की जुगाराच्या अड्डय़ासाठी आहे हेच समजत नाही. – भरत सटाळे, नागरिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा