उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तशंृगी देवीच्या गडावर आणि नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या शहरातील कालिकादेवी मंदिर परिसरात व्यवस्थापनाने मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून असामाजिक तत्त्वांवर नजर, कडेकोट बंदोबस्त, सप्तशृंग गडावर खासगी वाहनांना प्रतिबंध आदी माध्यमातून सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. भाविकांनी दर्शनासाठी येताना कमीत कमी सामान आणावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्तर महाराष्ट्रात भगूरची रेणुकादेवी, धुळे जिल्ह्यातील बिजासनी देवी व एकवीरा माता, म्हसदीची धनदाई माता आदी प्रमुख ठिकाणीही नवरात्रोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सर्वच मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, संपूर्ण परिसर या काळात उजळवून टाकला जाणार आहे.
सप्तशृंग गडावर १६ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे. या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन गडावर मंदिर परिसर, पायऱ्या, प्रसादालयासह अन्य ठिकाणी एकूण ४८ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याशिवाय उत्सव काळासाठी पोलीस अधीक्षकांची नेमणूक करतानाच तब्बल ५०० पोलीस गडावर तैनात राहणार आहेत. विश्वस्त मंडळाने दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. उत्सवकाळात खासगी वाहनांना गडावर
पाण्याचे दररोज पाच टँकर, अग्निशमन दल, नांदुरी ते सप्तशृंगी गड या १० किलोमीटरच्या प्रवासासाठी ६० बसेस, तर इतर आगारांतील २२५ बसेस भाविकांसाठी सज्ज राहतील. गडावर तात्पुरत्या बस स्थानकाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गडावर स्वच्छतेसाठी विश्वस्त मंडळ व ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. उत्सवकाळात चोवीस तास मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. गेल्या वेळी पावसामुळे बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. या वेळी तसे काही होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना एसटी महामंडळास दिल्या गेल्या आहेत. सप्तशृंग गडाप्रमाणे नाशिकचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालिका देवी मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने एकूण २३ सीसी टीव्ही कॅमेरे गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी बसविले असल्याची माहिती विश्वस्त केशव अण्णा पाटील यांनी दिली. भाविकांना दर्शनासाठी जाण्याच्या मार्गावर खास मंडप उभारताना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने दीपमाळ व कमानीचे कामही पूर्णत्वास नेण्यात आले आहे. या काळात परिसरात यात्रा भरत असल्याने जुना मुंबई-आग्रा महामार्ग दुपारनंतर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक देवी मंदिरांत नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून दोन दिवस आधीपासूनच पुन्हा एकदा ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान कागदपत्रांअभावी आढळणारी वाहने तसेच ५० पेक्षा अधिक समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा