नवरात्रोत्सव सोहळय़ासाठी श्री महालक्ष्मी मंदिरासह अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे. घटस्थापनेची जय्यत तयारी झाल्याचे चित्र शहरभर दिसत आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवतांच्या दर्शनासह दांडियाची धूमही लक्षवेधी ठरलेली असते.
कोल्हापुरातील महालक्ष्मीचे मंदिर पुरातन काळापासून तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. साडेतीन शक्तिपीठात याचा समावेश असल्याने शारदीय नवरात्रोत्सव येथे अतिशय उत्सवाने साजरा केला जातो. उद्या मंगळवारी घटस्थापना होऊन या सोहळय़ाला सुरुवात होणार आहे.
महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना परंपरेप्रमाणे केली जाणार आहे. सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तोफेची सलामी दिली जाईल. ९ वाजता घटस्थापनेच्या धार्मिक विधीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या हस्ते देवीची पूजा केली जाणार आहे. घटस्थापनेचा धार्मिक विधी झाल्यानंतर अभिषेक व अन्य प्रकारची विधी होणार आहे. उत्सवकाळात दररोज देवीची वेगवेगळय़ा रूपात पूजा बांधली जाते. उद्या दुपारी दीड वाजता अलंकारवस्त्र याद्वारे पूजा बांधण्यात येईल. रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळय़ाला सुरुवात होणार आहे.  नवरात्रीच्या निमित्ताने महालक्ष्मीचे मंदिर नेत्रदीपक रोषणाईने उजळून गेले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मीबरोबरच परिसरातील नवदुर्गा मंदिरात घटस्थापनेची जय्यत तयारी झाली आहे. तर युवा पिढी दांडियाच्या नियोजनात गुंतली आहे. गणेशोत्सवानंतर तरुण मंडळे नवरात्रोत्सवाच्या तयारीमध्ये गुंतले होते. उद्या देवीचे वाजतगाजत आगमन करण्यामध्ये कार्यकर्ते गुंतले असल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा