नवरात्र उत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत असून घरोघरी आणि विदर्भातील देवी मंदिरात कुळाचाराप्रमाणे घटस्थापना होणार आहे. शहरातील देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून नऊ दिवस अखंड दीप, दुर्गासप्तशतीचे पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण आदी धार्मिक कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
विदर्भात चंद्रपूरच्या महाकाली देवी, अमरावतीमधील एकविरा देवी, नागपूरमधील पारडी भागातील भवानी देवी, आग्याराम देवी, सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूजवळील रेणुका देवी, कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात व माहुरच्या रेणुका मंदिराशिवाय बुलढाण्यातील जगदंबा व चिखलीमधील रेणुका देवींच्या तसेच मौदा तालुक्यातील देवमुंढरी येथील श्री भवानी माता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. विदर्भासह शहरातील विविध भागात संकल्प, लोटस कल्चरल, रायसोनी, आर्ट ऑफ लिव्हिंग आदी संस्थांतर्फे गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चितारओळीत दुर्गा देवींच्या मूतीर्ंवर शेवटचा हात फिरविला जात असून मूर्तीकारांची लगबग वाढली आहे. बाहेरगावी जाणाऱ्या अनेक मंडळांनी वाजत गाजत देवींची मूर्ती घेऊन गेले. उद्या, सकाळपासून चितारओळीत दुर्गा देवींच्या मूर्ती नेण्यासाठी धावपळ सुरू होणार असून घटस्थापना करण्यात येईल. शहरातील विविध भागात नवरात्र उत्सवाची तयारी जोमात सुरू झाली आहे. आकर्षक मंदिर उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. खामलामध्ये सिंध माता मंडळातर्फे गोवर्धन पर्वत, उज्ज्वलनगर दुर्गा उत्सव मंडळातर्फे पशुपतीनाथ मंदिर, अभ्यंकरनगरमध्ये राजस्थान जैरासेलममधील जैन मंदिराची प्रतिकृती तयार केली जात आहे. या शिवाय अशोकनगरमध्ये गुरुनानक सभागृहाजवळ विशाल गुफा व भगवान शंकरजीच्या जटातून गंगा अवतरण असा देखावा तयार केला जात आहे. कोराडी, आग्याराम व पारडीतील भवानी देवीच्या मंदिरात दहा दिवस भाविकांच्या गर्दीचा ओघ बघता मंदिर परिसरात पोलीस सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या शिवाय विदर्भात व शहरातील विविध भागात होणाऱ्या गरबा दांडिया उत्सवाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खासगी सुरक्षा व्यवस्थेसह पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा