नवरात्र उत्सवासाठी व्यापाऱ्यांकडून सक्तीने वर्गणी (खंडणी) उकळण्याचा प्रकार सध्या सायबर सिटीत सुरू आहे. कामोठय़ात अशाच पद्धतीने एका व्यापाऱ्याला वर्गणीची सक्ती करणाऱ्या मंडळाच्या कार्याकर्त्यांविरोधात पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
कामोठे सेक्टर ६ परिसरातील तुलशीकृपा या इमारतीमधील व्यापारी आकाश आंबवडे यांच्याकडे काही तरुण मंडळी नवरात्री उत्सवासाठी वर्गणी मागण्यासाठी आली. आंबवडे यांनी आलेल्या मंडळींना परिसरात नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवालाही मदत केल्याचे सांगत आंबवडे यांनी स्वेच्छेने शंभर रुपयांची वर्गणी देऊ केली. त्यांनी आंबवडे यांना पाचशे रुपयांची सक्ती केली.
मात्र आंबवडे यांनी पाचशे रुपये वर्गणी देण्यास ठाम नकार दिला. यामुळे या देवीभक्तांचा राग अनावर झाला. त्यांनी दुकानात गोंधळ घालत तुला बघून घेतो, असा सज्जड दमच त्यांना भरला. या प्रकाराने घाबरलेल्या आंबवडे यांनी कामोठे पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अफ्रान शेख आणि विकास निकम या दोन कार्यकर्त्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन जगताप यांनी दिली.

Story img Loader