नवरात्र उत्सवादरम्यान गोंदिया ते सांत्रागाछी ही विशेष रेल्वेगाडी आजपासून सुरू करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या गाडीचा लाभ पूर्व विदर्भातील व जिल्ह्य़ातील दुर्गा माता भक्तांना मिळणार आहे.
दुर्गा उत्सवानिमित्त पश्चिम बंगालला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते, हीच बाब लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून गोंदिया ते सांत्रागाछी विशेष रेल्वेगाडीची सेवा दिली जात होती, मात्र गेल्या वर्षी यात खंड पडल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याची दखल घेत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन कमिटीच्या सदस्यांनी ही रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली.
त्याला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली असून यंदाही गोंदिया ते सांत्रागाछी रेल्वेगाडी १२, १४, १६, २० व २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता गोंदियावरून सोडण्यात येणार आहे. ही गाडी १९ डब्ब्यांचा असेल.
त्याचप्रमाणे दुर्गा उत्सव व दिवाळी लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे बिलासपूर ते पुणे ही विशेष साप्ताहिक रेल्वे १४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहे. दर महिन्याच्या रविवारी बिलासपूर येथून दुपारी दोन वाजता सुटणारी ही गाडी रात्री साडेआठ वाजता गोंदिया येथे येईल, तर रात्री साडेदहा वाजता नागपूरला पोहोचेल. तसेच दर महिन्याच्या सोमवारी पुण्याहून सुटणारी ही गाडी सकाळी साडेसहा वाजता नागपूर व दहा वाजता गोंदियात पोहोचेल. ही रेल्वेगाडी एक जानेवारीपर्यंत चालवली जाणार आहे.   

Story img Loader