शारदीय नवरात्रोत्सवाला करवीर नगरीत शनिवारी प्रारंभ झाला. राज्याचे आद्य शक्तीपीठ असलेल्या महालक्ष्मी मंदिरात सिंहासनस्थ महालक्ष्मी रूपातील पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी गर्दी केली होती. गरुड मंडपाजवळ मुखदर्शनाची सोय केल्याने गर्दीवरील ताण कमी झाला होता. सायंकाळी सार्वजनिक नवरात्र मंडळाच्या श्री मूर्ती आणण्यास सुरुवात झाली होती.
आदिशक्ती आणि स्त्री शक्तीच्या उपासनेचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज प्रारंभ झाला. करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात सकाळी विधीवत घटस्थापनेची पूजा झाली. या वेळी संस्थानकाळापासून सुरू असलेल्या परंपरेनुसार  तोफेची सलामी देण्यात आली. दुपारी अंबाबाईची सालंकृत पूजा झाली. वैभवशाली आणि प्रसन्न रूपातील सिंहासनस्त महालक्ष्मीची पूजा बांधण्यात आली. पहिलीच पूजा अजित ठाणेकर, उमेश उदगावकर, गजानन जोशी, संजय सामानगडकर, मनोज ढवळे यांनी बांधली. उद्या श्री कन्याकुमारी देवी रूपामध्ये पूजा बांधली जाणार आहे, असे श्रीपुजक दत्तात्रय ठाणेकर यांनी सांगितले.
घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. भाविकांना सुलभ रीत्या दर्शन घेण्यात यावे, याचे निजोजन केले होते. मंदिरात उभारण्यात आलेल्या मंडपात बॅरेगेटेड ला

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला महालक्ष्मी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. परंतु दर्शन रांगेचे उत्तम नियोजन केल्याने भाविकांना फार ताटकळत राहावे लागत नव्हते.

वण्यात आले होते. त्याद्वारे भाविकांची रांग शिस्तबद्ध रीत्या पुढे जात होती. शिवाय ज्या भाविकांना रांगेतून दर्शन घ्यायचे नाही, अशांसाठी मुखदर्शनाची सोय केली आहे. गरुड मंडपाजवळील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यामुळे तेथून देवीचे मुखदर्शन सहज रीत्या घेणे शक्य झाले होत.
मंदिराची सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. सीसी टीव्हीच्या माध्यमातून मंदिरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवले जात आहे. पोलीस, खासगी सुरक्षा रक्षक, व्हाइट आर्मी, कमांडो व विशेष फिरते पथक यांच्याकरवी गर्दीवर नियंत्रण ठेवले जात आहे.
मंदिराच्या आवारात महालक्ष्मी भक्तमंडळ व श्रीपूजक मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेआयोजन केले आहे. आज सकाळी येथे भावगीत व भक्तिगीतांचा तसेच लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम पार पडला. बुधवारी रात्री पं.शौनक अभिषेकी यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. रात्री परंपरेप्रमाणे पालखी सोहळा पार पडला. यंदापासून मोबाईल जॅमर सुरू करण्यात आला असला तरी पहिल्या दिवशी ही यंत्रणा अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरली नाही.मंदिराच्या आवारात मोबाईल फोन सुरूच असल्याचे दिसत होते. विशेषत मंदिरातील कर्मचारी, देवस्थान समिती यांचीच अडचण होत असल्याचे दिसत होते.
दरम्यान महालक्ष्मी भक्तांसाठी अविरत अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली आहे. मंदिराजवळ असलेल्या कपीलतीर्थ मार्केट येथील हॉलमध्ये एकाचवेळी २०० लोक भोजन घेऊ शकतात. रोज २ हजार भाविकांना अन्नदान केले जाणार आहे. नवरात्रीच्या कालावधीत सकाळी ११ ते ४ या वेळेत अन्नछत्र सुरू राहणार आहे.