अर्जुनी मोरगाव तालुक्यातील व्यापारी संघटनेतर्फे भारनियमनाविरोधात महाराष्ट राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा येताच भारनियमन करण्यात येऊ नये, असा संदेश प्राप्त झाला. लेखी आश्वासनानंतर आंदोलन संपुष्टात आले. अर्जुनी मोरगाव तालुका नक्षलवादग्रस्त म्हणून जाहीर झाला असतानाही येथे दररोज सहा तास भारनियमन केले जात आहे. अर्जुनी मोरगाव व गोठनगाव फीडर वगळता इतरत्र भारनियमन केले जात नाही. भारनियमनामुळे विजेवर चालणारे लघुउद्योग बंद असतात. इटियाडोह धरणाच्या पाण्याने सिंचन होते, मात्र भारनियमनामुळे वेळोवेळी धानपिकाला सिंचन होऊ शकत नाही.
भारनियमनामुळे व्यापारी व सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. या कारणांमुळे त्रस्त झालेल्या जनतेने १० एप्रिल रोजी महाराष्ट वीज वितरण कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चात सर्व पक्षांचे कार्यकत्रे उपस्थित होते. या निमित्ताने बाजारपेठ बंद होती. मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सहायक अभियंता भाजीपाले यांच्या कार्यालयात शिष्टमंडळ पोहोचले. त्या वेळी ते शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. उपस्थित जनसमुदायाचा राग अनावर झाला. त्यांनी कार्यालयासमोर लावलेले काही फलक तोडले, सूचना फलकाची काच फोडली, कार्यालयाबाहेर सुमारे तासभर रस्ता अडविला.
दरम्यान, तहसीलदार संतोष महाले यांना माहिती मिळताच ते म.रा.वीज वितरण कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कार्यालयाला मोच्रेकरांनी लावलेले कुलूप उघडले. सहायक अभियंता भाजीपाले व शिष्टमंडळाशी चर्चा केली. भाजीपाले यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यांनी अर्जुनी मोरगाव फीडर १० एप्रिलपासून या क्षेत्रात आल्याचे सांगून आजपासून भारनियमन बंद करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंत्यांना दिल्या. मोच्रेकऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेतल्यामुळे मोच्रेकऱ्यांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
६० मोच्रेकऱ्यांविरुद्ध गुन्हा
अर्जुनी मोरगाव येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी भारनियमनाविरोधात आंदोलन केले होते. या दरम्यान आंदोलनाचा भाग म्हणून अर्जुनी मोरगाव येथील सहायक अभियंता यांच्या कार्यालयाचे दरवाजे आंदोलकांनी बंद केले होते. भारनियमनाविरोधात लढणे या आंदोलकांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी सहायक अभियंताच्या तक्रारीवरून पोलिसांनी ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्जुनी मोरगाव तालुका आदिवासीबाहुल्य व नक्षलवाददृष्टय़ा अंतिसंवेदनशील तालुका आहे. मात्र याच तालुक्यातील अर्जुनी मोरगाव व गोठनगाव फीडरवर तब्बल सहा तासांचे भारनियमन सुरू होते. त्यामुळे जनसामान्यांमध्ये वीज वितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला होता. या रोषाचे रूपांतर आंदोलनात झाले होते.