उंच शिडशिडीत बांधा, ‘बॉब’ केलेले कुरळे केस, इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व, भेदक नजर आणि कार्यक्षेत्रातल्या गावांवर चटकन अधिराज्य गाजवण्याची वृत्ती, यासारखी अनेक वैशिष्टय़े जोपासून चळवळीत अढळ स्थान निर्माण करणाऱ्या जहाल नक्षलवादी नर्मदाचा शेवट एक मोठा अध्याय समाप्त करून गेला आहे.
शेजारच्या आंध्रच्या किनारपट्टी भागातून तीस वर्षांपूर्वी तेव्हाच्या रयत कुली संगममध्ये सक्रीय असलेल्या नर्मदामध्ये चांगले नेतृत्वगुण आहेत, हे आता नेतेपदी असलेल्या गणपतीने तेव्हाच ओळखले होते. नंतर पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना झाली तेव्हा नर्मदाला या चळवळीसाठी झटणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या कोअर ग्रूपमध्ये आपसूकच प्रवेश मिळाला. तेलंगणा भागात नर्मदाने कामाची चुणूक दाखवायला सुरुवात केल्यानंतर तिला लगेच आंध्र, छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात पाठवण्यात आले. तेव्हापासून नर्मदाचा गडचिरोलीशी संबंध आला आणि शेवटपर्यंत तो कायम राहिला. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोन कमेटीच्या अखत्यारीत येणारा या तीनही राज्याचा भूभाग तिचे कार्यक्षेत्र बनला. छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर, कांकेर, तर अबूजमाडच्या पायथ्याशी असलेले नारायणपूर, महाराष्ट्रातील दक्षिण गडचिरोली व आंध्रमधील करीमनगर याच भागात नर्मदा सुमारे २५ वष्रे सक्रीय राहिली. यथावकाश दक्षिण गडचिरोलीची विभागीय सचिव झाल्यानंतर नर्मदाला केंद्रीय समितीत स्थान देण्यात आले, पण कधीही तिने पदोन्नतीसाठी कुरकूर केली नाही. चळवळीच्या नेतृत्वाने कार्यक्षेत्र बदलण्याच्या संदर्भात अनेकदा नर्मदासमोर प्रस्ताव ठेवले, पण त्यासाठी तिने कायम ठाम नकार दिला. चळवळ विस्ताराच्या निमित्ताने याच भागातील अनेक गावांशी आपले नाते प्रस्थापित झाले असून याच भागात मी आयुष्य काढणार, असे ती वरिष्ठांना सरळ सांगायची. अलीकडच्या दहा वर्षांत चळवळीचा नूर पालटायला लागला. अनेक नवे सदस्य चळवळीत दाखल झाले. सामान्य जनतेशी वागण्याच्या पद्धतीत बराच बदल झाला. या सर्व बदलांशी नर्मदाने अगदी व्यवस्थित जुळवून घेतले. नव्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका ती नेहमीच घेत असे. या भागातल्या कोणत्याही गावात नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांची बैठक आयोजित केली की, ज्येष्ठतेनुसार अध्यक्षपदाचा मान तिच्याकडेच असायचा.
एक वर्षांपूर्वीचीच गोष्ट. चळवळीला तीस वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आदिवासी मुलांना शिक्षणासाठी व शेतीसाठी निधी देण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला. या भागात या निर्णयाच्या अंमलबजावणीचे काम नर्मदावर सोपवण्यात आले. यासाठी तिने गावागावांमध्ये शेकडो बैठका घेतल्या. एक वर्षांपूर्वीच छत्तीसगडमधील सलवा जुडूमच्या नेत्यांनी भामरागड तालुक्यात शांतीयात्रा काढली. या यात्रेवर बारकाईने लक्ष असलेल्या नर्मदाने ही यात्रा संतपाच पुन्हा त्याच गावांमध्ये बैठका घेऊन ‘जुडूम’ कसे बोगस आहे, हे सांगण्याचा सपाटा सुरू केला. काँग्रेसचे नेते मालू बोगामी व बहादूरशाह आत्राम यांना ठार करण्याचा निर्णय नर्मदाचाच. यापैकी मालूची हत्या केल्यानंतर काही महिन्यांनी आमची चूक झाली, अशी कबुली गावकऱ्यांसमोर देणारीही नर्मदाच होती. प्रसंगी कठोर निर्णय घ्यायचे व त्याची अंमलबजावणी केल्यानंतर जनतेत निर्माण झालेल्या नाराजीला हाताळण्यासाठी पुन्हा लवचिकता स्वीकारायची, हे केवळ नर्मदालाच जमायचे. त्यामुळे जनतेशी संवाद साधण्यासाठी नक्षलवादी तिलाच समोर करायचे. २००९ मध्ये लाहेरीला नक्षलवाद्यांनी एका चकमकीत १७ पोलिसांना ठार केले. या चकमकीत नर्मदा मारली गेली, अशी अफवा उठली होती. प्रत्यक्षात तिला काहीच झालेले नव्हते. उलट, या चकमकीत जखमी झालेल्या नक्षलवाद्यांना उचलून नेण्यासाठी लाहेरीतून खाटा आणण्याचा विचार सुचवणारी नर्मदाच होती.
या चळवळीत दाखल होणाऱ्या मुलींसाठी नर्मदा एक मोठा आधार होता. चळवळीत मुलींचे होणारे लैंगिक शोषण ही नित्याची बाब. त्यामुळे अनेक मुली नर्मदाजवळ आपले मन मोकळे करायच्या. नर्मदा मात्र या मुलींची समजूत काढायची. प्रकरण वाढणार नाही, याकडे लक्ष द्यायची. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या नर्मदाने या शोषणाविषयी कधीच कठोर भूमिका का घेतली नाही, हे मात्र एक न उलगडलेले कोडेच राहिले. सलग तीस वष्रे पोलिसांशी युद्ध खेळूनही नर्मदाला कधीच जखमी व्हावे लागले नाही. या चळवळीत दिर्घकाळ वावरणाऱ्या अनेकांच्या नशिबी असे सुदैव येत नाही. चळवळीचे बडे नेते प्रत्यक्ष चकमकीच्या वेळी सुरक्षित स्थळी असतात. नर्मदा मात्र कायम आघाडीवर असे. ज्येष्ठता मिळाली म्हणून तिने कधीच माघार घेतली नाही. तेलगू, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषांवर प्रभुत्व असलेल्या नर्मदाचा या भागात बराच दारारा होता. तिच्या भेदक नजरेला गावकरी टाळायचे. एवढे असूनही अतिशय क्रूर, अशी प्रतिमा तिने कधीच निर्माण होऊ दिली नाही, हे तिचे आणखी एक वैशिष्टय़. सलग तीस वष्रे जंगलात राहून कोणत्याही व्याधीपासून दूर राहणे, हे या चळवळीत भल्याभल्यांना जमले नाही. नर्मदा मात्र कायम तंदुरुस्त राहिली. त्यामुळे इतर सहकाऱ्यांना तिचा हेवा वाटायचा.
शेवटच्या काळात विभागीय सचिव शेखर व भास्करमधील वादामुळे नर्मदा बरीच विचलित झालेली होती, मात्र अखेपर्यंत तिने संयम ढळू दिला नाही.
अतिशय शांतपणे विचार करून निर्णय घेणे आणि एकदा निर्णय घेतला की, त्याच्या परिणामांची पर्वा न करणे, हेच सूत्र नर्मदाने अखेपर्यंत राबवले. नर्मदाच्या जाण्याने या चळवळीने एक महत्त्वाचा मोहरा गमावला आहे, एवढे मात्र निश्चित!    
छत्तीसगडमध्ये अंत्यसंस्कार
४ डिसेंबरच्या चकमकीत ठार झालेल्या नर्मदावर छत्तीसगडमधील बांदे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगेवाडा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिचा पती किरण हजर होता. किरण छत्तीसगडमध्ये या चळवळीच्या मुद्रण विभागाची जबाबदारी सांभाळतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा