दहा जागांसाठी अखेर निवडणूक, १२ जण रिंगणात
जिल्हा नियोजन समिती निवडणूक
जिल्हा नियोजन समितीच्या (डिपीसी) ३६ पैकी २६ जागांवर आज बिनविरोध निवड झाली. आता १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक होत असलेल्या १० पैकी ९ जागा जिल्हा परिषद सदस्यांतून तर एक जागा शिर्डी नगर परिषदेच्या सदस्यांतून निवडायची आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी प्रयत्नशील होते, मात्र काही सदस्यांच्या हटवादी भूमिकेमुळे अखेर निवडणूक घ्यावी लागली. दि. ११ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
जिल्हा परिषद सदस्यांतून निवडून द्यायच्या ३३ जागांपैकी २४ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यातील ११ राष्ट्रवादीला, ९ काँग्रेसला, शिवसेना व भाजपला प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. सेना-भाजप व कम्युनिस्ट व दोन अपक्ष अशा एकुण तिघांनी जि. प. सत्तेत राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. अपक्ष विश्वनाथ कोरडे राष्ट्रवादीचेच मानले जातात. त्यांना संधी देत राष्ट्रवादीने अपक्ष व कम्युनिस्टांना ठेंगा दाखवला.
निवडणूक होत असलेल्या जागा: सर्वसाधारण पुरुष (जि. प. सदस्यांतून), जागा ९, उमेदवार १०- बाळासाहेब हराळ, बाबासाहेब दिघे, बाबासाहेब तांबे, आण्णासाहेब शेलार, अशोक आहुजा, राजेंद्र फाळके, शरद नवले, संभाजी दहातोंडे व विश्वनाथ कोरडे. आज अर्ज मागे घेतलेले उमेदवार- बाजीराव गवारे, सत्यजित तांबे, कॉ. आझाद ठुबे व शारदा भोरे. सर्वसाधारण महिला (शिर्डी नगर परिषद), १ जागा-सविता कोते व आशा कोते.
बिनविरोध उमेदवार असे: महिला राखीव-चित्रा बर्डे, सुनिता भांगरे, आशा मुरकुटे, निर्मला गुंजाळ, उज्वला शिरसाट, ललिता आहेर, मोनिका राजळे, सुरेखा राजेभोसले व नंदा वारे. अनुसुचित जाती, २ जागा-रावसाहेब साबळे व शाहुराव घुटे. अनुसुचित जमाती, १ जागा-संगीता गायकवाड. अनुसुचित जाती महिला, २ जागा-जयश्री डोळस व मंदा गायकवाड. नागरीकांचा मागास प्रवर्ग: सर्वसाधारण पुरुष, ५ जागा- विठ्ठलराव लंघे, परमवीर पांडुळे, राहुल जगताप, सुभाष पाटील व परबत नाईकवाडे.
नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला, ५ जागा-सुरेखा शेळके, मिरा चकोर, नंदा भुसे, अश्विनी भालदंड, कालिंदी लामखेडे. नगरपालिका क्षेत्र: ओबीसी महिला, १ जागा -अनिता पोपळघट व सर्वसाधारण महिला, १ जागा-मिनल खांबेकर.
विविध जागांवरील १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन उपजिल्हाधिकारी संजय बागडे व ज्योती कावरे काम पहात आहेत.
दिवसभर खलबते
सत्यजित तांबे अर्ज मागे घेणार हे काँग्रेसने पूर्वीच निश्चित केले होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारीची खलबते जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यावर रंगली होती. जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, सभापती कैलास वाकचौरे व गटनेते शरद नवले यांनी यादी निश्चित केली. पालकमंत्री बबनराव पाचपुतेही मोबाईलवरुन संपर्कात होते. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी निश्चित केलेली यादी आज पुर्णत: बदलली गेली. मंजुषा गुंड यांचे नाव पुन्हा वगळले व राजेभोसले यांचे नाव आले. उषा मोटकर यांच्याऐवजी सभापती शाहुराव घुटे यांचे नाव समाविष्ट झाले. इतरही बदल झाले. सेना-भाजपला प्रत्येकी २ जागा मिळणार होत्या. त्याऐवजी दबावतंत्राने राष्ट्रवादीकडून आणखी एक-एक जागा त्यांच्या पदरात पडेल, मात्र ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे राष्ट्रवादीचा कोटा १६ वरुन १४ वर आला. भाजपचे आ. शिवाजी कर्डिले, सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, सभापती हर्षदा काकडे व बाबासाहेब तांबे, गटनेते बाजीराव गवारे त्यासाठी सरकारी विश्रामगृहावर ठाण मांडून बसले होते. सभापती तांबे ऐवजी आपले नाव निश्चित व्हावे यासाठी दत्तात्रेय सदाफुले शेवटपर्यंत हटुन बसले होते. त्यामुळे जि. प.च्या सर्वसाधारण ९ जागांसाठी अखेर निवडणूक घ्यावी लागत आहे. तांबे यांचेही नाव वगळले जाणार होते, मात्र त्यांनी गाडे विरोधी गटाची मदत घेत उमेदवारी कायम ठेवली. सर्वच पक्षांनी उमेदवारी माघारीच्या सह्य़ा घेऊन ठेवल्या होत्या. अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष शेलार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा