अर्थसंकल्पातील भरीव आर्थिक तरतूद खर्च होऊ नये, यासाठी शहरातील विकासकामे ठप्प करण्याचे कारस्थान महापालिका प्रशासनाकडून रचले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी आयुक्त आर. ए. राजीव यांना अंगावर घेतले. शिवसेना आणि राजीव यांच्यात वरचेवर चकमकी घडत असताना राष्ट्रवादीनेही आता विकास कामे ठप्प केल्याचा आरोप करत राजीव यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याची चर्चा गुरुवारी महापालिका वर्तुळात दबक्या आवाजात सुरू होती.
कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नसल्याने निविदा प्रक्रियेस उशीर होत आहे. त्यामुळे ठेकेदारांना कामाचा आदेश मिळत नसल्याने शहरातील विकासकामे रखडली असून केवळ विकासकामांचा बागुलबुआ उभा करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत केला. विशेष म्हणजे, एरवी आयुक्त राजीव यांच्या पाठीशी उभे राहाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला लक्ष्य केल्याने शिवसेनेचे नगरसेवक सुखावल्याचे चित्र होते.
निविदा प्रक्रियेचा प्रवास कशा प्रकारे आणि त्यासाठी काही कालमर्यादा लागू असते का, असा सवाल राष्ट्रवादीच्या सदस्यांनी गुरुवारी स्थायी समितीमध्ये उपस्थित केला. त्यावर महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र त्यावर समाधानी नसलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निविदा प्रक्रियेसंबंधीच्या प्रश्नांचा भडिमार करून महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही लेखा परीक्षण विभागाकडून ताशेरे कसे ओढले जातात, त्या संबंधित विभागावर काय कारवाई केली जाते. तसेच त्याला कोण जबाबदार असते, असा सवालही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रभागातील कामांकरिता सदस्यांनी दररोज चार ते पाच तास पाठपुरावा केल्यानंतर कामाची मंजुरी मिळण्यास एक वर्षांचा कालावधी लागतो. तसेच कामाची निविदा काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची कालमर्यादा नाही, त्यामुळे या प्रक्रियेस संबंधित विभागाकडून उशीर होत असल्यानेच शहरातील विकासकामे ठप्प आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या सदस्यांनी यावेळी केला. तसेच निविदा प्रक्रियेसाठी कालमर्यादा लागू करण्यासंबंधी ठराव करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र स्थायी समितीमध्ये निविदा प्रक्रियेसंबंधी एक ठराव करण्यात आला होता, त्याचीच अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे कालमर्यादा लागू करण्यासंबंधीच्या ठरावाची अंमलबजावणी होईल का, असा सवाल उपस्थित करत आतापर्यंत प्रभागातील एकाही कामाचा आदेश काढण्यात आलेला नाही, असा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी केला.
दरम्यान निविदा प्रक्रियेसंबंधी महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र चुकीची माहिती देण्यात आली असल्याचे सांगत अर्थसंकल्पातील भरीव तरतूद खर्च होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील विकासकामे ठप्प करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला. तसेच या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी स्थायी समितीची सभा तहकूब करण्याची मागणी राष्ट्रवादी सदस्यांनी करताच त्याला भाजपच्या सदस्यांनी पाठिंबा दिला.
राजीव यांच्याविरोधात आता राष्ट्रवादी आक्रमक
अर्थसंकल्पातील भरीव आर्थिक तरतूद खर्च होऊ नये, यासाठी शहरातील विकासकामे ठप्प करण्याचे कारस्थान महापालिका प्रशासनाकडून रचले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी आयुक्त आर. ए. राजीव यांना अंगावर घेतले.
First published on: 22-02-2013 at 12:45 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp agrassive against r a rajiv