जिल्ह्य़ात ग्रामीण भागातील सहा मतदारसंघांपैकी पाच जागेवर भाजपने विजय प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि सेनेला आपले मतदारसंघ शाबूत ठेवता आले नाहीत. तर काँग्रेसने आपली जागा कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत ग्रामीणमध्ये भाजपच्या दोन जागा वाढल्या आहेत.
सर्वाधिक अटीतटीची लढत हिंगणा मतदारसंघात झाली. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार समीर मेघे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश बंग यांचा १७ हजार ०२० मतांनी पराभव केला. मेघे यांना ४९ हजार ६३७ तर रमेश बंग यांना ३२ हजार ६१७ मते मिळाली. समीर मेघे मतमोजनीच्या पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवली. काँग्रेसच्या कुंदा राऊत यांना १५ हजार, सेनेचे प्रकाश जाधव यांना ९ हजार मते मिळाली. काटोल मतदार संघात भाजपचे आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा फक्त ४ हजार ३३५ मतांनी पराभव केला. आशिष देशमुख यांना ५३ हजार ९१५ तर अनिल देशमुख यांना ४९ हजार ५८० मते मिळाली. सेनेचे राजेंद्र हरणे हे तिसऱ्या क्रमांवार आले. त्यांना ५ हजार मते मिळाली. शेतकरी कामगार पक्षाचे राहुल देशमुख चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.  
उमरेडमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बसपचे रुक्षदास बन्सोड यांचा ५८ हजार ००५ मतांनी पराभव केला. पारवे यांना ९१ हजार ९५१ तर बन्सोड यांना ३३ हजार ९४६ मते मिळाली. कामठी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी १ लाख २६ हजार ७५५ एवढी मते मिळवून तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांना ८६ हजार ७५३ मते मिळाली. बावनकुळे यांना ४० हजार ००२ मताधिक्य मिळाले. सेनेचे तापेश्वर वैद्य यांना १२ हजार ७९१ व राष्ट्रवादीचे डॉ. महेंद्र लोधी यांना ७५२ मते मिळाली.
रामटेकमध्ये चौरंगी लढतीत भाजपचे डी. मल्लीकार्जून रेड्डी यांनी शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांचा २२ हजार ०६९ मतांनी पराभव केला. रेड्डी यांना ५९ हजार २०३ तर जयस्वाल यांना ३७ हजार १३४ मते मिळाली. सुबोध मोहिते हे ३५ हजार ४५८ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर तर डॉ. अमोल देशमुख ९ हजार १४० मते घेऊन चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. मनसेचे योगेश वाडीभस्मे यांना केवळ २ हजार ३३६ एवढय़ा मतांवर समाधान मानावे लागले. तर अपक्ष उमेदवार संजय सत्यकार यांनी ३ हजार ४३३ मते मिळवून आश्चर्याचा धक्का दिला. ज्या मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष लागले होते, त्या सावनेर मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील केदार हे ९ हजार २०९ मतांनी विजयी झाले. केदार यांना ८४ हजार ६३० तर त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेचे विनोद जीवतोडे यांना ७५ हजार ४२१ मते मिळाली. ११ हजार ०९७ मते मिळवून बसपचे सुरेश डोंगरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
राष्ट्रवादीचे किशोर चौधरी यांना ६ हजार १३९, मनसेचे प्रमोद ढोले यांना १०४२ मतांवर समाधान मानावे लागले. केदार यांच्या रुपाने जिल्ह्य़ात काँग्रेसला एकमेव जागा मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत केदार यांचा फक्त तीन हजार मतांनी विजय झाला होता. यावेळी मोदी लाटेत त्यांचा पराभव होईल, असे राजकीय विश्लेषक म्हणत होते. परंतु त्यांचा हा अंदाज सपशेल खोटा ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा