थरावर थर रचत निर्माण होणारा थरार हे केवळ मुंबईतल्याच दहीहंडीचे वैशिष्टय़ राहिले नसून, दहीहंडीचा हा ‘महिमा’ परभणीसारख्या ठिकाणीही लोकप्रिय होऊ लागला आहे. युवकांच्या उत्साहाला राजकीय स्पध्रेची जोड मिळत असून दहीहंडी कार्यक्रमात मिळणाऱ्या मोठय़ा प्रतिसादातून यास पुष्टीच मिळत आहे.  
राजे संभाजी मित्रमंडळातर्फे आमदार संजय जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित शिवसेनेच्या दहीहंडीस अभिनेता गोिवदा, राष्ट्रवादीतर्फे आयोजित दहीहंडीस अभिनेत्री महिमा चौधरी हिने हजेरी लावली. युवकांच्या उत्साहाला चालना देतानाच दहीहंडीच्या माध्यमातून मोठे शक्तिप्रदर्शनही घडत आहे. राजकीय सत्तास्पर्धाही त्यात दिसू लागली आहे. आमदार जाधव यांच्या पुढाकाराने झालेला दहीहंडी उत्सव जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणावर, तर राष्ट्रवादीच्या पुढाकाराने झालेला दहीहंडी उत्सव वसमत रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसतिगृहानजीक मदानावर पार पडला. दोन्ही कार्यक्रमांना परभणीकरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लाखोंची बक्षिसे, भव्य प्रकाश योजना, आकर्षक व्यासपीठ, रोषणाई, अद्ययावत ध्वनियंत्रणा या माध्यमातून हे दहीहंडी उत्सव लोकाभिमुख करण्याकडे संयोजकांचा कल दिसून येत आहे.
आमदार जाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षी दहीहंडी उत्सव पार पडतो. सुरुवातीला स्थानिक पातळीवर होणाऱ्या या उत्सवात अभिनेत्यांना आणण्याची परंपरा गेल्या वर्षांपासून सुरू झाली. गेल्या वर्षी शक्ती कपूरला निमंत्रित केले होते. या वर्षी गोिवदा आकर्षण ठरला. या दहीहंडीचे पहिले बक्षीस नांदेड येथील जय बजरंग मित्रमंडळाने पटकावले. आमदार जाधव, जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, शिवसेनेचे पालिकेतील गटनेते अतुल सरोदे, संदीप भंडारी, मारोती बनसोडे आदींसह शिवसनिक या वेळी मोठय़ा संख्येने होते. नांदेडच्याच जय बजरंग मित्रमंडळाने राष्ट्रवादीच्याही दहीहंडीचे बक्षीस पटकावले.
सेनेच्या दहीहंडीनंतर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांनी दहीहंडीचे आयोजन केले. माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, माजी खासदार सुरेश जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, महापौर प्रताप देशमुख यांच्यासह या वेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. युवकांचा भरघोस प्रतिसाद पाहू जाता अलीकडे दहीहंडीचे मुंबईतील लोण आता जिल्हास्तरापर्यंत येऊन ठेपले आहे.

Story img Loader