महापालिका निवडणुकीत आपल्या विरोधात प्रचार केल्याचा राग मनात धरून दोघा बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक पीरअहमद शेख हे ७ एप्रिलपासून अद्याप फरारी आहेत. दरम्यान, शासकीय रुग्णालयातील उपचार अर्धवट सोडून नगरसेवक शेख यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बससेले फुरकान शहापुरे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या ७ एप्रिल रोजी किडवाई चौकात फुरकान शहापुरे व त्यांचे बंधू इरफान शहापुरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी नगरसेवक पीरअहमद शेख यांच्यासह त्यांचा मुलगा आसीफ शेख, जावेद शिकलगार, नासीर शेख, आझम शेख, अस्लम शेख, इसाक शेख आदी दहा-बाराजणांवर जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
जखमी शहापुरे यांनी हल्लेखोर नगरसेवक शेख यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याने संरक्षण मिळावे म्हणून पोलीस यंत्रणेकडे लेखी पत्र दिले होते. परंतु नगरसेवक शेख व पोलिसांचे साटेलोटे असल्याने आपल्या पत्राकडे दुर्लक्ष झाले. सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप जखमी शहापुरे यांनी केला आहे. प्राणघातक हल्ल्यानंतर नगरसेवक शेख हे उजळ माथ्याने फिरत असूनही त्यांना पोलिसांकडून अटक होत नसल्याची माहिती मिळाल्याने जखमी फुरकान शहापुरे यांनी शासकीय रुग्णालयातील उपचार अर्धवट सोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन आमरण उपोषण सुरू केले. उपोषणास आठवडय़ाचा कालावधी उलटला तरी पोलिसांना नगरसेवक शेख हे सापडत नाहीत. पोलिसांनी जेमतेम पाच जणांना अटक केली असून त्यापैकी एक आरोपी जावेदी शिकलगार हा आजारी असल्याचे निमित्त पुढे करून शासकीय रुग्णालयात दाखल झाला आहे. रुग्णालयात तो गेल्या आठवडय़ापासून पोलीस अथवा न्यायालयीन कोठडी टाळून ‘उपचार’ तथा ‘विश्रांती’ घेत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शहापुरे यांनी केली आहे. तर जोपर्यंत नगरसेवक शेख यांना अटक होत नाही,तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा दिल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी शहापुरे यांना त्यांची प्रकृती बिघडल्याने जबरदस्तीने ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
प्राणघातक हल्ल्यात अडकलेला राष्ट्रवादी नगरसेवक अद्याप फरारीच
महापालिका निवडणुकीत आपल्या विरोधात प्रचार केल्याचा राग मनात धरून दोघा बंधूंवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणात अडकलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक पीरअहमद शेख हे ७ एप्रिलपासून अद्याप फरारी आहेत.
First published on: 19-04-2013 at 02:16 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp corporater fugitive in attempt to murder case of shahapure