माळशिरस तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल धक्कादायक लागले असून बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीची पीछेहाट झाली आहे. वेळापूर या अति संवेदनशील ग्रामपंचायतीत सत्ताधारी शेतकरी संघटनेने सत्ता राखत संख्याबळही वाढवले. तर गेली वर्षांनुवर्षे बिनविरोध पाणीव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने चंचूप्रवेश केला.
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (दि. २६) होऊन आज (मंगळवार) महसूल भवन माळशिरस येथे सकाळपासून मतमोजणी झाली. माळशिरस येथे निवडणुकीसाठी सत्ताधारी विरोधक एकवटल्याने तिरंगी लढत होऊन तिन्ही गटांना प्रत्येकी ६ जागा मिळाल्या. वेळापुरात शेतकरी संघटनेचे उत्तमराव जानकर यांनी १७ पैकी ११ जागा मिळवल्या. जानकर यांचे यापूर्वी ७ सदस्य होते. निमगावात १५ पैकी ९ जागा जिंकून राष्ट्रवादीने सत्ता राखली. पं.स. सदस्य के. के. पाटील यांच्या गटाला ६ जागा मिळाल्या, खंडाळीत सत्तांतर होऊन सुभाष गांधी यांच्या आघाडीला १५ पैकी ९ जागा मिळाल्या. मोहिते पाटील यांचे निवासस्थान असणाऱ्या यशवंतनगरमध्येही प्रथमच एका प्रभागासाठी निवडणूक झाली. त्या दोन्ही जागा मोहिते पाटील गटास मिळाल्या. पं.स. सभापती सौ. राजलक्ष्मी माने पाटील यांच्या बागेचीवाडी मध्ये त्यांच्या गटाने ११ पैकी ९ जागा जिंकल्या. मात्र स्वत: हंसराज माने पाटील यांचा पराभव झाला. संगमगावातही सत्तांतर होऊन राष्ट्रवादीला सत्ता गमवावी लागली. माजी आमदार शामराव पाटील यांच्या पाणीव गावात बिनविरोध ग्रा.पं. निवडणुकीची परंपरा या वर्षी प्रथमच खंडित होऊन निवडणूक झाली. त्यामध्ये पाटील गटाने ९ पैकी ८ जागा मिळवल्या. तर मोहिते पाटील गटाला १ जागा मिळाली. या निवडणुकीत जत सेवा संघटनेनेही सदाशिवनगर ग्रा.पं. वर सत्ता मिळवली तर डॉ. रामदास देशमुखांनी इस्लामपूरमध्ये सत्ता मिळवली. या निवडणुकीत मोहिते पाटील गटाला फार मोठा झटका बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा