तोडफोड ही मनसेची संस्कृती- शेलार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तोडफोड हाच अजेंडा ओह असा आरोप करतानाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गाडय़ांच्या ताफ्यावरील दगडफेकीचा इन्कार केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगून दगडफेक कोणी केली याचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी त्यांनी केली.
मंगळवारी रात्री मनसे व राष्ट्रवादी समर्थकांमध्ये झालेली धुमश्चक्री व राज ठाकरे यांच्या मोटारींच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या पाश्र्वभुमीवर शेलार पत्रकारांशी बोलत होते. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे, अंबादास गारूडकर, बाळासाहेब जगताप, किसनराव लोटके आदी यावेळी उपस्थित होते.
सोलापूर येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर व अश्लील भाषेत टीका केली, हीच गोष्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सहन होणारी नाही. मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी त्याचा रितसर मार्गानेच निषेधाची भुमिका घेतली आहे. काळे झेंडे दाखवून लोकशाही मार्गानेच राष्ट्रवादीने प्रतिकात्मक निषेध केला. यावेळी झालेल्या दगडफेकीशी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा काहीच संबंध नाही. या प्रकाराबद्दल चुकीचे चित्र रंगवले जात आहे. मनसेचे कार्यकर्ते उभे होते त्या बाजूनेच दगड आले, त्यात राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते व पोलीसही
जखमी झाले असे शेलार यांनी सांगितले.
नगर शहरतील राष्ट्रवादीच्या कार्यालयावरही काल (मंगळवार) रात्री उशीरा दगडफेक झाल्याची तक्रार शेलार यांनी केली, त्यात इमारतीच्या खिडक्यांचे किरकोळ नुकसान झाल्याचे ते म्हणाले. आपला निषेध करण्याची वेळ का आली याचे राज ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे असे आवाहनही त्यांनी केले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही लढाई विचारांची व प्रतिकात्मकच असेल असे शेलार म्हणाले.

Story img Loader