परभणी जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व राखले. एकूण २४पैकी १३ जागांवर राष्ट्रवादीच्या सदस्यांची निवड झाली. काँग्रेसला ५, शिवसेना ४, भारतीय जनता पक्ष व घनदाट मित्रमंडळाला प्रत्येकी १ जागा मिळाली.
शेवटच्या टप्प्यात या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली. समितीवर अनेक दिग्गजांची वर्णी लागली. महापौर प्रताप देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे, अ‍ॅड. बाळासाहेब जामकर, मेघना बोर्डीकर आदींचा यात समावेश आहे. समितीवर निवडून द्यावयाच्या २४ जागांसाठी निवडणूक झाली. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सोयीच्या लढती व्हाव्यात व शक्य झाल्यास बिनविरोध निवड व्हावी, असेही प्रयत्न झाले. पण सर्वाच्याच प्रतिष्ठा पणाला लागल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग खुंटला. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, भाजप या सर्वच पक्षांनी बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले. परंतु जिल्हा परिषद व नगरपालिकांमधून निवडून द्यावयाच्या २० जागांवर तडजोड होऊ शकली नाही. महापौर देशमुख, रहिमाबी शेख महेबूब, काँग्रेसचे मो. हसीबुर रहेमान व शिवसेनेच्या अमिनाबी शेख यांची बिनविरोध निवड झाली. जि. प. अनुसूचित जाती गटातून भरत घनदाट व अनुसूचित जमातीतून काँग्रेसचे कुंडलिक लिंबाळकर बिनविरोध निवडून आले. २४पैकी ६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. गुरुवारी उर्वरित १८ जागांसाठी मतदान घेण्यात आले. मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद गटातून नियोजन समितीवर निवडून द्यावयाच्या जागेबाबत सर्व पक्षात एकजूट झाली. राष्ट्रवादीला ८, काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी ३, भाजप व घनदाट मित्रमंडळ प्रत्येकी १ अशी ही तडजोड झाली.

Story img Loader