राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या िपपरी-चिंचवड शहरातील राजकीय सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, त्यांना आमदार व स्थानिक नेत्यांची अस्वस्थता पाहावयास मिळाली. आयुक्त आल्यापासून राष्ट्रवादीचे दुखणे वाढले असून ते जितका काळ राहतील तितके राष्ट्रवादीचे नुकसान व विरोधकांचा फायदा होईल. निवडणुकाजिंकायच्या असतील तर पाडापाडी थांबवा नाही तर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तरी मार्गी लावा, असा सूर त्यांनी निरीक्षकांसमोर आळवल्याचे वृत्त आहे.
राष्ट्रवादीचे नरसिंग मेंगजी, काका चव्हाण, शरद बुट्टे पाटील या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत िपपरीतील पक्ष कार्यालयात बैठक झाली. शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांच्यासह विजय लोखंडे, उल्हास शेट्टी, सुरेखा लांडगे, राजेश पिल्ले, मयूर कलाटे व विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर मोहिनी लांडे व पक्षनेत्या मंगला कदम मुंबईला गेल्याने अनुपस्थित होत्या, तर स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी तिकडे फिरकलेच नाहीत.
बैठकीतील चर्चेत पक्षाचे वातावरण कसे आहे व आणखी सुधारणा करण्यासाठी काय करावे लागेल, अशी माहिती निरीक्षकांनी घेतली. तेव्हा अनेकांनी आगपाखडच केली. आयुक्त आल्यापासून केवळ पाडापाडी करत आहेत. इतर कामे ठप्प आहेत. राष्ट्रवादीने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे आश्वासन मतदारांना दिले असल्याने या पाडापाडीने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नागरी सुविधा बंद केल्या, टॅक्स दुप्पट केला. आता पोलिसांचा त्रास सुरू झाला आहे. नागरिक राष्ट्रवादीच्या नावाने बोटं मोडत असून नगरसेवक हताश आहेत. विरोधक राष्ट्रवादीला टार्गेट करत आहेत. खासदार व आमदार निवडून आणायचे असतील तर हे चित्र बदलले पाहिजे. अजितदादांना आयुक्तांविषयी सातत्याने सांगितले. मात्र, ते ऐकत नाहीत. नगरसेवक, आमदार असो आयुक्त कोणालाही किंमत देत नाहीत. सत्ता असूनही शासकीय कमिटय़ा मिळत नाहीत, अशा तक्रारी करण्यात आल्या. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने वेळ मागूनही ते देत नाहीत, याकडे त्यांनी अजितदादांचे लक्ष वेधण्यास सांगितले.
पक्ष निरीक्षकांसमोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा थयथयाट
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या िपपरी-चिंचवड शहरातील राजकीय सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात आलेल्या पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र, त्यांना आमदार व स्थानिक नेत्यांची अस्वस्थता पाहावयास मिळाली.
First published on: 02-02-2013 at 04:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leaders agracive in front of party inspector