कळव्याच्या नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना संबंधित ठेकेदाराकडून कळवेकरांच्या एकमेव उद्यानाची अक्षरश: हेळसांड सुरू असून बांधकाम साहित्य, भंगाराचे सामान ठेवण्यासाठी येथील ‘नाना-नानी’ पार्कचा वापर सुरू असल्यामुळे या भागातील रहिवासी महापालिकेच्या नावाने खडे फोडू लागले आहेत. कळवा चौकात सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे. असे असताना याच पुतळ्यासमोर ‘नाना-नानी’ पार्कला खेटूनच आणखी एक अश्वारूढ पुतळा उभा केला जात आहे. त्यामुळे या पुतळ्याच्या आवश्यकतेविषयी वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत असले तरी या कामामुळे कळवेकरांच्या बागडण्याचे ठिकाण असलेल्या उद्यानाची वाताहत झाली आहे. दररोज मोठय़ा संख्येने लहान मुले, त्यांचे पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांचा या उद्यानात वावर असतो. कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शिवप्रेमापुढे पुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी यामुळे उद्यानाचा मात्र उकीरडा झाला आहे.
कळव्याच्या ‘नाना-नानी’ पार्कचा उकीरडा
कळवा येथील मुख्य चौकातील मेघडंबरीतील शिवरायांचा पुतळा अस्तित्वात आहे. असे असताना याच चौकासमोर शिवाजी महाराजांचा सुमारे १२ फुटी अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. कळवा येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी खाडी पुलालगत असलेल्या जागेत महापालिकेने नाना-नानी पार्क उभारले असून हे उद्यान कळवेकरांसाठी एकमेव मंनोरंजनाचे ठिकाण आहे. कळव्यात बेसुमार, बेकायदा बांधकामे उभी असून भूखंड माफियांनी जागोजागी मोकळ्या जागा बळकावल्याने कळव्यातील रहिवाशांना पाय मोकळे करण्यासाठी एखादे मैदान किंवा उद्यान अपवादानेच आढळते. नियोजनाच्या मोठय़ा गप्पा मारणारे या भागातील आव्हाडपंथीय नेते याविषयी साधा ‘ब्र’देखील उच्चारताना दिसत नाहीत. या पाश्र्वभूमीवर या भागातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कळवा नाक्यावर शिवाजी महाराजांचा सुमारे १२ फुटी ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम मोठय़ा आग्रहाने सुरू केले असून त्याच्या अनावरणासाठी राष्ट्रपतींना आमंत्रित केले आहे. त्यामुळे या पुतळ्याच्या उभारणीचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र पुतळा उभारताना लागूनच असलेल्या उद्यानाचे तीनतेरा वाजविले जात आहेत. उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच या प्रवेशद्वारावरच पुतळा तसेच कमान उभारणीचे काम सुरू असल्याने उद्यान बंद अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या स्वखर्चातून उभारण्यात येत असलेल्या पुतळ्याच्या कामासाठी उद्यानाची पुरतीच हेळसांड होत आहे. या उद्यानामध्ये ठिकठिकाणी बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. आव्हाडांच्या या शिवप्रेमापुढे कळवावासीय तर हतबल आहेतच शिवाय महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही मौन धारण करून आहेत.
दुसरा पुतळा कशासाठी..
कळवा येथील मुख्य चौकात छत्रपती शिवरायांचा मेघडंबरीतील पुतळा अस्तित्वात आहे. असे असतानाही याच पुतळ्यासमोरील उद्यानालगत दुसरा म्हणजेच १२ फुटी पुतळा उभारण्यामागचे नेमके प्रयोजन काय, असा यक्ष प्रश्न कळवाकरांना पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा व्यक्त करण्यासाठी हा पुतळा उभारला जात असल्याचा दावा अव्हाड यांचे समर्थक करत असले तरी उद्यानाच्या दुरवस्थेविषयी कुणीही बोलण्यास तयार नाहीत. महापालिकेचे विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांच्याकडे यासंबंधी विचारणा केली असता पुतळ्याच्या अनावरणाचा सर्व खर्च महापालिका करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्यान व्यवस्थित केले जाईल, असेही ते म्हणाले.
आव्हाडांचे शिवप्रेम उद्यानाच्या मुळावर
कळव्याच्या नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना संबंधित ठेकेदाराकडून कळवेकरांच्या एकमेव उद्यानाची अक्षरश: हेळसांड सुरू असून बांधकाम

First published on: 12-12-2013 at 09:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mla jitendra awhads love for shivaji