िपपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्य़ातील वाढती गुन्हेगारी हे गृहखात्याचे अपयश असून गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे खात्यावर कसलेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तया करून राष्ट्रवादीच्या आमदार मंडळींनी ठाण्यावरच कब्जा मिळवला आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी िपपरीत केला.
िपपरीच्या विविध प्रश्नांवर पालिका आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी आढळराव महापालिकेत आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी श्रीरंग बारणे, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, अजय सायकर, विजय फुगे आदी उपस्थित होते.
आढळराव म्हणाले,‘‘राज्यात सर्वाधिक गुन्हेगारी शहरात होऊ लागली आहे. वाढती गुन्हेगारी हे गृहखात्याचे अपयश आहे. गृहमंत्र्यांची जरब राहिलेली नसून पोलीस खात्यावर नियंत्रणही नाही. राष्ट्रवादीकडे गृहखाते असल्याचा भलताच अर्थ पक्षाच्या आमदारांनी घेतला आहे. ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी स्वत:च्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करून आमदार मंडळी गृहखात्याच्या कारभारात उघडपणे ढवळाढवळ करत आहेत. पुणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात अनेक गुन्हे प्रलंबित अवस्थेत आहेत. आमदारांनी हौसेने मागवून घेतलेले पोलीस अधिकारी निष्क्रिय ठरल्याने गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे.
संरक्षण खात्यातील गुंतागुंत कायम आहे. त्यांच्या चुकांचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. कवडीमोल किंमतीत लष्कराने हजारो एकर जागा घेतली. त्यावर भूमिपुत्रांनाच अटकाव केला जातो. सुरक्षेचा विषय महत्त्वाचा असला तरी नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. ‘एनडीए’ साठी आठ हजार एकर जागा घेतली गेली. त्यातील ८० टक्के जागा वापरात आली नाही. त्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सुरू आहे, असे आढळराव म्हणाले.
‘संरक्षण खात्याकडून ठोस निर्णय नाही’
‘आदर्श’ प्रकरणानंतर केंद्रातील मंत्री संरक्षण खात्याच्या जागांबाबत निर्णय घ्यायला धजावत नाहीत. नियमांवर व तांत्रिक बाबींवर बोट ठेवले जाते. त्यामुळे कोणताच ठोस निर्णय होत नाही. सरकार निष्क्रिय असल्याचा अनुभव जवळपास सर्वच खासदारांना येतो आहे. संरक्षण खात्याच्या प्रश्नांसाठी शरद पवार व अन्य खासदारांनी प्रयत्न केले असतील. मात्र, या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यावर तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न
केल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव यांनी म्हटले आहे.    

Story img Loader