महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे विरोधकांनाही आ. सुरेश जैन यांच्याबद्दल ममत्व वाटू लागले असून त्यात आता राष्ट्रवादीचे खा. ईश्वरलाल जैन यांची भर पडली आहे. सार्वजनिक काम करताना आ. सुरेश जैन यांच्याकडून काही तांत्रिक चुका झाल्या असतील, पण त्यात भ्रष्टाचार अजिबात झाला नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध झालेली कारवाई दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. महापालिका निवडणुकीत आमदार मनीष जैन हे सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील आघाडीशी आघाडी करू शकतील, असेही वक्तव्य त्यांनी केल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही चकित झाले आहेत.
शहरातील एका व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी खा. जैन बोलत होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या येथील विधान परिषद निवडणुकीपासून खा. जैन हे स्वपक्षाशीच दुरावले आहेत. खासदारांचे पुत्र मनीष यांना निवडून आणण्यात सुरेश जैन यांचा सिंहाचा वाटा होता. युतीच्या अधिकृत उमेदवाराला सहकार्य न करणारे सुरेश जैन अपक्ष उमेदवार मनीष जैन यांच्यासोबत होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार रिंगणात असताना राष्ट्रवादी खासदाराचा पुत्र अपक्ष निवडणूक लढतो यामागील गणितही सर्वाना उमगले आहे. २००९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार असताना राष्ट्रवादीच्या मनोज चौधरी यांनी बंडखोरी करून सुरेश जैन यांचा विजयाचा मार्ग सुकर करणे हे सर्व जळगावकर ओळखून आहेत. आम्ही तुम्हाला आता मदत करतो, तुम्ही आम्हाला विधान परिषदेसाठी मदत करा असा करारनामाच जणू दोन्ही जैनांमध्ये झाला असावा, असे त्या वेळी जळगावकरांना वाटत होते.
खा. जैन हे आपण पक्षाशी बांधील आहोत, नेत्यांवर आमची पूर्ण निष्ठा असल्याचा दावा करीत असले तरी आता सुरेश जैन यांच्याविषयी सहानुभूती दाखवून त्यांच्याशी आपले घनिष्ठ संबंध असल्याचे दाखवून दिले आहे.

Story img Loader