पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरून आजच्या जिल्हा परिषदेच्या सभेत राष्ट्रवादी व काँग्रेस सदस्यांत हमरी-तुमरी माजली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरेगा योजनेत कमांड क्षेत्रात विहिरींच्या कामास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याचे श्रेय पाचपुते यांना देत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा प्रयत्न केला, त्यास काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. दोन्ही बाजूंच्या सदस्यांत मोठी खडाजंगी रंगली. प्रचंड आरडा-ओरडाही झाला. बेशिस्ती, गैरवर्तनाचे मुद्देही उपस्थित करण्यात आले. अखेर पाचपुते यांच्यासह जिल्ह्य़ातील बाळासाहेब थोरात व विखे हे दोन मंत्री, तसेच मुख्यमंत्र्यांच्याही अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभा अनेक विषयावर वादळी ठरली. प्रभारी सीईओ रवींद्र पाटील व सदस्य बाळासाहेब हराळ यांच्यातील वाद पुन्हा याही सभेत उफाळला. हराळ व भाजपचे गटनेते बाजीराव गवारे यांच्यामध्ये, तसेच सुजित झावरे व काँग्रेस सदस्यांतही शाब्दिक चकमकी उडाल्या.
मंत्रिमंडळात निर्णय झाल्याची व तो आपल्याला पालकमंत्र्यांनी कळवल्याची माहिती लंघे यांनी सभागृहात दिली. राष्ट्रवादीचे गटनेते शरद नवले यांनी त्याबद्दल पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याचा प्रयत्न केला. अद्याप सरकारचे परिपत्रक जारी झालेले नाही, अभिनंदन कसले करता, अशी हरकत हराळ यांनी घेतली. लंघे यांनी, एक सदस्य म्हणणे मांडत असताना हराळ यांना तुम्ही मध्ये बोलण्याचे कारण नाही, असे सांगत अडवले. काँग्रेसचे सत्यजित तांबेही हराळ यांच्या मदतीला धावले, त्यांनी जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव करा, शिवाय मंत्रीमंडळाचा निर्णय असल्याने मुख्यमंत्र्यांच्याही अभिनंदनाचा ठराव करा अशी सूचना केली.
लंघे यांनी पाचपुते पालकमंत्री आहेत, असे सांगत राष्ट्रवादीच्या सदस्यांचे समर्थन केले. त्यामुळे गदारोळ निर्माण झाला. दोन्ही बाजूंचे सदस्य उठुून तावातावाने म्हणणे मांडत होते, आरडा-ओरडाही झाला, लंघे यांच्यासह राष्ट्रवादीचे नवले, झावरे, तर काँग्रेसचे अण्णासाहेब शेलार, तांबे, हराळ, यांच्यात वाक्युद्ध रंगले. लंघे यांनी हराळ यांना परवानगीशिवाय न बोलण्याचा व खाली बसण्याचा आदेश दिला तसेच गैरवर्तन, बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही दिला, त्यावरुन पुन्हा लंघे-हराळ यांच्यातील वाद पेटला. अखेर तांबे व सुनिल गडाख यांनी त्यांना शांत केले.
शेलार यांनी तिन्ही मंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची सूचना केली, त्यावर नवले यांनी ठराव मांडताना पालकमंत्र्यांचे विशेष प्रयत्न व दोन्ही मंत्र्यांचे सहकार्य असा शब्द प्रयोग केला, त्यामुळे तांबे यांनी पुन्हा हरकत घेतली व काही काळ शांत झालेला वाद पुन्हा पेटू लागला होता. अखेर लंघे यांनी तिन्ही मंत्र्यांचे विशेष प्रयत्न असा शब्दप्रयोग करण्यास मान्यता दिली.      
महावितरणचा निषेध
दुष्काळ जाहीर करताना राज्य सरकारने शेती पंप व पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा वीजपुरवठा खंडीत करु नये असा आदेश दिला असतानाही महावितरणने कुरणवाडी व १९ गावांच्या (ता. राहुरी) पाणी योजनेची वीज खंडित केली, त्याबद्दल सुभाष पाटील यांनी महावितरणचा निषेध केला. महावितरण सरकारला जुमानत नाही का की त्यांचा सरकारशी असहकार आहे, असा आक्षेप त्यांनी घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा