राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अव्वल स्थान प्राप्त केले. भविष्यात विधानसभांचे मतदारसंघ कायमचेच विशिष्ट पक्षाला दिले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पक्षाच्या ताकदीवरूनही पुढील विधानसभा मतदारसंघाची गणिते ठरणार आहेत, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामाला लागल्याचे संकेत दिले. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीही आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा सूर प्रकट केला.
राष्ट्रवादीने शुक्रवारी येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या मराठवाडा विभागीय अभ्यास शिबिरात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’ असा आदेशच देण्यात आला. परभणी महापालिकेच्या कल्याण मंडपम् येथे झालेल्या या अभ्यास शिबिराचे उद्घाटन पिचड यांनी केले. माजी उपमुख्यमंत्री पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)मंत्री जयदत्त क्षीरसागर, तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान, पालकमंत्री प्रकाश सोळंके, शिबिराचे समन्वयक वसंत वाणी, आमदार विनायक मेटे, बाबाजानी दुर्राणी, जयप्रकाश दांडेगावकर व जयदेव गायकवाड, जि. प.अध्यक्षा मीना बुधवंत, शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, महापौर प्रताप देशमुख, जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. मधुसुदन केंद्रे आदी उपस्थित होते.
त्या-त्या भागातल्या जनतेने मागणी केल्यामुळेच आपण सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. जनतेसमोर सिंचनाबाबतची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकेच्या रूपाने पुढे आली पाहिजे. राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचा डाव काहींनी सुपारी घेतल्यासारखा सुरू केला आहे. यातूनच कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, भविष्यकाळ आपलाच याची खात्री बाळगा असा विश्वास पवार यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिला. शिबिराच्या समारोपप्रसंगी पवार यांनी ‘पवार विरुद्ध पवार’ यांसारखे विषय माध्यमे विनाकारण चघळत असल्याची टीका केली.
तत्पूर्वी पहिल्या सत्रात गृहमंत्री पाटील यांचे भाषण झाले. ‘उभ्या महाराष्ट्राचे आशास्थान’ असा अजितदादांचा उल्लेख त्यांनी भाषणात केला. जलसिंचनासंदर्भात श्वेतपत्रिका जनतेसमोर यावी, अशी आमचीही मागणी आहे. मात्र, या कारणावरून आम्हाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून कोणी ठोकत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाहीत. विरोधकांच्या आरोपांना जशास तशी उत्तरे दिली जातील. राष्ट्रवादीची ताकद वाढली असताना ताकदीच्या प्रमाणात लोकशाहीची बूज राखून अधिक जागांचा आमचा दावा अमान्य कसा होऊ शकेल, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.
पिचड यांनी राष्ट्रवादी स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी करू शकतो, असे सूतोवाच केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबत वक्तव्य केले होते, याकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले. शिबिरात मंत्री क्षीरसागर यांनी ‘शतप्रतिशत राष्ट्रवादी’ अशी भूमिका मांडून स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबत मत प्रदर्शित केले. आमदार मेटे यांनीही राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवावी, असे सांगितले. राजेश टोपे, सुरेश वरपूडकर यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन रमाकांत कुलकर्णी यांनी केले. स्वराज परिहार यांनी आभार मानले.     
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
राष्ट्रवादीच्या अभ्यास शिबिरासाठी काही तज्ज्ञ मार्गदर्शकांना बोलविले होते. ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी ‘वंचित वर्गाचा शैक्षणिक विकास’, अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी ‘अन्न सुरक्षा विधेयक’, प्राचार्य यशवंत पाटणे यांनी ‘यशवंतराव चव्हाण ते शरद पवार’ या विषयांवर मांडणी केली. डॉ. सुधीर भोंगळे यांनी सिंचन क्षेत्राबद्दल भाषण केले. राज्यमंत्री खान यांनी अल्पसंख्य कल्याणाबाबतच्या योजनांची माहिती दिली.

Story img Loader