ज्यांना मतदारसंघाचे वाटोळे करण्याची घराणेशाही लाभली आहे, त्यांच्या तोंडी विकासाची भाषा शोभत  नाही, अशी खरमरीत टीका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अजय चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे केली. विकासाला विरोध करण्याची मेघना बोर्डीकर यांची भूमिका असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
झुणका-भाकर केंद्राच्या अपुऱ्या जागेत प्रवासी निवारा उभारण्याऐवजी नियोजित जागेत बसस्थानक उभारावे व झुणका-भाकर केंद्राची जागा महिला बचत गटासाठी ठेवावी, अशी संयुक्तिक भूमिका आमची होती. मात्र, प्रवासी निवाऱ्यास आमचा विरोध असल्याचे बोर्डीकर यांनी भासवले, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. बोरी परिसरात कोणी राजकारण करून जनतेला विकासापासून वंचित ठेवित असेल तर राष्ट्रवादी काँगेस रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे, असेही त्यांनी बोर्डीकर यांच्या आरोपावर बोलताना ठणकावले.
परभणी लोकसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा मेघना साकोरे बोर्डीकर यांनी प्रवासी निवारा वादावर खुलासा करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विकासकामांना अडथळा आणणे हा खानदानी उद्योग झाल्याची टीका करून ठोशास ठोसा देण्याची भाषा केली होती. या टीकेचा चौधरी यांनी या वेळी समाचार घेतला.
गेली २५ वर्षे मतदारसंघाचे वाटोळे करणाऱ्या लोकप्रतिनिधींना विकासाची भाषा शोभत नाही. प्रवासी निवारा उभारण्यास राष्ट्रवादीचा विरोध आहे, असे चित्र युवक काँगेसकडून निर्माण केले. परंतु ते चुकीचे आहे. बोरी बसस्थानकासाठी जागा निश्चित केली आहे. त्या ठिकाणी इमारत उभी राहावी, अशी राष्ट्रवादीची भूमिका होती, असेही चौधरी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Story img Loader