तीर्थक्षेत्र आळंदी समस्यांच्या गर्तेत असून त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचा आरोप करत आळंदीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी येथील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठय़ा संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले.
आळंदी हे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही तेथे घाणीचे साम्राज्य आहे. खड्डेमय रस्ते, वाहतुकीचा खोळंबा, उदासीन पोलीस यंत्रणा, अशुध्द पाणी, कचरा, धूर, डेंग्यू, दूषित नदीपात्र, बांधकाम आराखडा आदी समस्यांमुळे आळंदीकर त्रस्त आहेत. सर्वात महत्त्वाचा व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा ग्रामीण रुग्णालयाचा विषय आहे. आम्ही विरोधी पक्षात असल्याने आवाज दाबला जात आहे. प्रशासनाकडून दाद मिळत नाही, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आले. सरकारने आळंदीच्या विकासाचे गाठोडे हरणाच्या शिंगाला बांधले आहे. हरिण सापडले तर तुमचा विकास करू नाही तर भकासपणाच ठेवू, अशी विचित्र भूमिका घेतली आहे. सात डिसेंबरपासून कार्तिक यात्रा सुरू होत असूनही कसलेच नियोजन नाही. या सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असल्याचे नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा