राष्ट्रवादी मतदारसंघ विकास कार्यक्रमांतर्गत पराभूत उमेदवाराच्या मतदारसंघात देण्यात येणाऱ्या सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीचे अर्ज जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी प्रदेशाध्यक्ष आ. भास्कर जाधव यांच्याकडे मुंबई येथील पक्ष कार्यालयात सुपूर्द केले.
लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीने जिल्ह्य़ातील स्थान मजबूत करण्यावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले आहेत ते आपल्याकडे खेचण्यासाठी त्या मतदारसंघात विशेष निधी देण्याची राजकीय खेळी राष्ट्रवादीकडून खेळण्यात येत आहे. केंद्र व राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादीला नाशिक जिल्ह्य़ात मागील निवडणुकीत फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ येवला, नांदगाव व कळवण या तीन ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तसेच जिल्ह्य़ातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा खासदार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही बाब लक्षात घेत राष्ट्रवादीने जिल्ह्य़ातील पराभूत मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
त्यापैकी देवळाली, निफाड, दिंडोरी, चांदवड, मालेगाव या मतदारसंघात पक्षाच्या वतीने लोकहिताची कामे करण्यासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.संबंधित तालुकाध्यक्षांना जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्याकडे आपल्या मतदारसंघातील कामे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या निधीच्या अर्जाचे तालुकाध्यक्षांना जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत खा. समीर भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते. राज्यसभा आणि विधानसभा, परिषद सदस्यांना राज्यभरात कुठेही आपला निधी वितरण करण्याची मुभा असते.
 त्यासाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी मतदारसंघ विकास कार्यक्रम’ सुरू केला आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादीतर्फे आपल्या लोकप्रतिनिधींचा हा निधी प्रदेश पातळीवर एकत्र करून त्याचे मतदारसंघनिहाय वितरण करण्यात येते. त्यातून महिलांसाठी स्वच्छतागृह, विहीर, उद्यान साहित्य, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह, समाजमंदिर, हातपंप, सभा मंडप, सार्वजनिक शौचालये आदी कामे करण्यात येणार आहेत.

Story img Loader